नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या निधनानंतर पक्षात उलथापालथ होताना दिसत आहे. पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनाच पक्षातून बेदखल करण्याची तयारी सुरु आहे. काकासह पाच खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे नजीकच्या काळात राष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (Ram Vilas Paswan Son Chirag Paswan may get big jolt as 5 MPs planning to leave LJP)
लोक जनशक्ती पक्षातून बेदखल करण्याची तयारी?
चिराग पासवान यांना वगळता लोजपचे उरलेले पाचही खासदार वेगळा गट बनवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे खासदार जनता दल (युनायटेड) अर्थात जेडीयू नेत्यांच्या संगनमताने हे राजकीय षडयंत्र रचत असल्याची चर्चा आहे. पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनाच लोक जनशक्ती पक्षातून बेदखल करण्याची तयारी सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काकासह पाच खासदारांची जुळवाजुळव
पशुपती कुमार पारस (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि महबूब अली केशर हे पाच खासदार जेडीयूमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची विनंती केली. अशावेळी बिहारच्या राजकारणात एकाकी पडलेल्या चिराग यांना मोठा झटका बसू शकतो.
रामविलास पासवानांकडूनच ‘ती’ जागा भावाला
राम विलास पासवान यांचे 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्याआधी ते आजारी होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. राम विलास पासवान यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतःची हाजीपूरची जागा धाकटे बंधू पशुपती कुमार पारस यांना दिली होती. त्यानंतर ते राज्यसभेवरुन संसदेत गेले. भाजपचे रवी शंकर प्रसाद लोकसभेवर निवडून गेल्यानंतर रिक्त झालेली जागा भाजपने मित्रपक्ष लोजपला दिली होती. मोदी सरकारमध्ये पासवान यांना अन्न आणि नागरी पुरवठा कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
संबंधित बातम्या:
Ram vilas Paswan | अनंत आठवणींसह कोट्यवधींचा वारसा, रामविलास पासवान यांची संपत्ती किती?
“पासवान यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान, चिरागवर संशय” मांझींच्या पक्षाचं पंतप्रधानांना पत्र
(Ram Vilas Paswan Son Chirag Paswan may get big jolt as 5 MPs planning to leave LJP)