अमेरिकेतील यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम 2025 च्या वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यामध्ये भारताची गुप्तचर संस्था रॉ (RAW) वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. भारताने हा अहवाल फेटाळत ‘पक्षपाती आणि राजकीय हेतूने प्रेरित’ असल्याचे म्हटले आहे. 2023 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एका अमेरिकन शीख फुटीरतावाद्यांच्या हत्येच्या प्रयत्नात रॉ असल्याच्या आरोप या अहवालात करण्यात आला आहे. यामुळे जगभरात भारतीय गुप्तचर संस्थेची चर्चा होत आहे. या रॉचे एजंट रवींद्र कौशिक पाकिस्तानी लष्करात मेजर बनले होते. त्यांनी अनेक गोपनीय माहिती भारताला दिली होती. 1952 मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या कौशिक यांना भारताच्या इतिहासातील सर्वात महान गुप्तहेर म्हटले जाते. सलमान खानची भूमिका असलेला ‘एक था टाइगर’ हा चित्रपटा त्यांच्या जीवनावरच आधारीत आहे.
रिसर्च अँड एनालिसिस विंग म्हणजेच रॉ चे एजंट रवींद्र कौशिक यांना नोव्हेंबर 1975 मध्ये पाकिस्तानात एजेंट म्हणून पाठवण्यात आले. त्यांनी पाकिस्तानात राहून जी कारनामे केले त्यामुळे भारत नेहमी पाकिस्तानपेक्षा वरचढच ठरला. रवींद्र कौशिक यांना पाकिस्तानात पाठवण्यापूर्वी त्यांची सुंताही करण्यात आली होती. तसेच त्यांना मुस्लिम नाव नबी अहमद शाकीर दिले होते. पाकिस्तानात गेल्यावर कौशिक यांनी लॉ विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याठिकाणी पदवी घेतल्यानंतर पाकिस्तान लष्करात दाखल झाले. त्यांना पाकिस्तानी लष्करात मेजर पदापर्यंत पदोन्नती मिळाली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांनी ब्लॅक टायगर म्हणत होत्या.
रवींद्र कौशिक यांनी पाकिस्तानातील स्थानिक मुलीशी लग्न केले होते. त्यांनी उर्दूचेही शिक्षण घेतले. 1979 ते 1983 या काळात त्यांनी अनेक महत्वाची माहिती भारताकडे पाठवली. यामुळे लष्करी चालीत भारत नेहमी अव्वल राहिला.
रॉ ने एक दुसऱ्या गुप्तहेराला कौशिक यांना भेटण्यासाठी पाठवले होते. त्याला पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने पकडले. त्याने पाकिस्तानसमोर रवींद्र कौशिक यांचे सर्व राज उघडले. त्यानंतर कौशिक यांना अटक करण्यात आली. पाकिस्तानने त्यांना अनेक आमीष दाखवले. परंतु त्यांनी शेवटपर्यंत तोंड उघडले नाही. 1985 मध्ये त्यांना पाकिस्तान कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत केले गेले. 2001 मध्ये मियांवाली कारागृहात ह्रदयविकारने त्यांचे निधन झाले.
रॉ वर नेहमीच शेजारी देशांच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जातो. अफगाणिस्तानात भारताच्या वाढत्या राजनैतिक हालचाली ही रॉ एजंट्सची चाल आहे, असे पाकिस्तानला वाटते. बलुचिस्तान प्रांतातील फुटीरतावाद्यांना प्रशिक्षण आणि शस्त्रे रॉ पुरवत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. रॉकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत.