रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण
देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी झाल्यापासून भांडवली बाजार आणि अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी शक्तिकांत दास सातत्याने कार्यरत आहेत. | Shaktikanta Das
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta das) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शक्तिकांत दास यांनी स्वत: ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसली तरी माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना मी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. (RBI Governor Shaktikanta Das tests positive for Coronavirus)
कोरोनाची लागण झाली असली तरी शक्तिकांत दास घरी आयसोलेशनमध्ये राहून आपले काम सुरुच ठेवतील. त्यामुळे रिझर्व्ह बँकेतील काम सामान्यपणे सुरु राहील. मी डॉक्टर आणि रिझर्व्ह बँकेतील अधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंग आणि दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्कात असल्याचेही शक्तिकांत दास यांनी म्हटले.
देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी झाल्यापासून भांडवली बाजार आणि अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी शक्तिकांत दास सातत्याने कार्यरत आहेत. या काळात त्यांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पांरपरिक आणि अपारंपरिक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला होता.
I have tested COVID-19 positive. Asymptomatic.Feeling very much alright.Have alerted those who came in contact in recent days.Will continue to work from isolation. Work in RBI will go on normally. I am in touch with all Dy. Govs and other officers through VC and telephone.
— Shaktikanta Das (@DasShaktikanta) October 25, 2020
काही दिवसांपूर्वीच शक्तिकांत दास यांनी एका कार्यक्रमात भारतीय अर्थव्यवस्था ही पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर असल्याचे वक्तव्य केले होते. कोरोनामुळे देशाची आर्थिक स्थिती ढासळली होती. ती आता पूर्ववत होताना दिसत आहे. केंद्र सरकार आणि मध्यवर्ती बँकेकडून परिस्थितीजन्य लवचिकता दाखवत मौद्रिक आणि वित्तीय धोरणांचा सातत्याने पाठपुरावा केल्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले होते.
आगामी काळात अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी बाजारपेठेत पुरेसे भांडवल उपलब्ध झाले पाहिजे. त्यासाठी अनेक बँकांनी भांडवल उभारणी केली असून उर्वरित वित्तीय संस्थांकडूनही तयारी सुरु आहे. आगामी काही महिन्यांत या योजना पूर्णत्वाला जातील, असा विश्वासही शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला होता.
संबंधित बातम्या:
RBI | G-20 देशांमध्ये भारताची आर्थिक परिस्थिती चांगली : शक्तिकांत दास
ना सुट्टी, ना वेळेची मर्यादा, डिसेंबरपासून 365 दिवस 24 तास RTGS सेवा; शुल्क आणि नियम काय?
RBI ने पैशांच्या व्यवहारांशी संबंधित नियम बदलले; जाणून घ्या, 10 महत्त्वाच्या गोष्टी
(RBI Governor Shaktikanta Das tests positive for Coronavirus)