Onion Price : कांद्या करणार वांधे! पुढील महिन्यात असा कापल्या जाणार खिसा
Onion Price : टोमॅटोनंतर आता कांदा रडविण्याच्या तयारीत आहे. दोन महिन्यांपूर्वी कांद्याला भाव मिळत नसल्याने त्याविरोधात शेतकऱ्यांना आंदोलन केले होते. पण आता कांदा त्यांना मालामाल करणार आहे तर ग्राहकांना रडवणार आहे. इतका वाढणार आहे भाव..
नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : देशात टोमॅटोच्या भावाने (Tomato Price) आकाशाला गवसणी घातली आहे. टोमॅटोने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. अनेक घरातून टोमॅटो सध्या हद्दपार झाले आहे. देशभरात टोमॅटोच्या किंमती वाढल्या आहेत. एक किलो टोमॅटोसाठी 200 रुपयेच नाहीतर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत आहे. इतर भाजीपाला पण महागला आहे. यामध्ये अद्रक, भेंडी, मिरची, भोपळा आणि इतर भाज्यांचा समावेश आहे. या यादीत आता कांद्याने (Onion Price) पण एंट्री केली आहे. एका रिपोर्टनुसार, कांदा खाणाऱ्यांचे वांधे करणार आहे. काही वर्षांपूर्वी देशात कांद्यामुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती ओढावली होती. त्यावेळी कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. केंद्र सरकारने हस्तक्षेप करत पाकिस्तान आणि इतर देशातून कांदा आयात केला होता. पुढील महिन्यात कांद्याची किंमत दुप्पट होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
किती वाढतील किंमती?
सध्या कांदा 28 रुपये ते 32 रुपये किलो विक्री होत आहे. पुढील महिन्यात काद्यांचे भाव 70-80 रुपये किलो दरम्यान असतील. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने ही दरवाढ झाली होती.
तरीही दिलासा
कांद्याच्या किंमती पुढील महिन्यात 60-70 ते 70-80 रुपये किलोपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आह .क्रिसिलच्या मार्केट इंटेलिजेन्स अँड एनालिटिक्सच्या रिपोर्टनुसार, पुढील महिन्यात कांद्याचे भाव 80 रुपयांच्या घरात पोहचले तरी 2020 मधील किंमतींपेक्षा ते कमीच असतील.
किती दिवस कांदा महाग?
रब्बी पिकातील कांद्याची शेल्फ लाईफ 1-2 महिने कमी होते. यावर्षी फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात कांद्याची विक्री झाल्याने रब्बीतील कांद्याचा स्टॉक सप्टेंबरपूर्वी ऑगस्ट महिन्यातच संपण्याची शक्यता आहे. कांद्याची ही महागाई फार मोठ्या कालावधीसाठी नसेल. पुढील 15-20 दिवसांसाठी ही महागाई असेल.
कारण तरी काय
शेतात कांद्याचे उत्पादन घटल्याने कांद्याची आवक रोडवली आहे. अवकाळी आणि मुसळधार पावसाचा फटका पण कांद्याला बसला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे देशभरात भाव वाढण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात कांद्याचा भाव दुप्पट होण्याची शक्यता आहे.
दरवाढीचा आलेख
पावसाळा सुरु होताच जून ते जुलै महिन्याच्या दरम्यान तूरडाळीच्या किंमतींनी 12.5 टक्क्यांची उसळी घेतली. उडदाची डाळ 3.9 टक्क्यांनी महागली.तांदळाने दरवाढीचा नवीन रेकॉर्ड केला आहे. तांदळाच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ झाली. गुरुवारी तांदळाची सरासरी किंमत 41 रुपये प्रति किलोग्रॅमवर झाली. गेल्यावर्षी हा भाव 37 रुपये होता. गव्हाची महागाई 2.96 टक्क्यांहून 4.49 टक्क्यांवर पोहचला आहे. गव्हाच्या किंमती वधारल्याने महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे.