अब्दुल सत्तार यांना मतिमंद शाळेत भरती करा, जालन्यातून ‘या’ नेत्याचा खोचक सल्ला!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एका शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेऊन अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
जालनाः सुप्रिया सुळेंना(Supriya Sule) शिवीगाळ करणाऱ्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मतिमंदांच्या शाळेत भरती करा असा खोचक सल्ला देण्यात आलाय. जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी हा सल्ला दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राज्यात एक संतापाची लाट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी जोर केली जातेय. त्यातच आता नेत्यांना कसे बोलावे, भाषा कशी असावी, याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.
शिंदे गटाचे प्रवक्ते तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतंच यासंदर्भात वक्तव्य केलंय. नेत्यांनी कसं बोलावं, यासंदर्भात प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं केसरकरांनी म्हटलं.
त्यावर कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अब्दुल सत्तार यांना मतिमंद शाळेत भरती करा किंवा त्यांना शिकवण्यासाठी एखादा मतिमंद शिक्षक नियुक्त करा..
पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असलेले अब्दुल सत्तार सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रडारवर आहेत. त्यातच त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना शिवीगाळ केली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीने जोरदार मोहीम सुरु केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एका शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेऊन अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात महाराष्ट्रात प्रचंड राग असल्याची प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र दबावाखाली सत्तार यांचा राजीनामा घेत नाहीयेत, अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरु आहे.