प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेडमध्ये बांग्लादेशचे जवान सहभागी होणार
भारतीय उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार बांग्लादेश सशस्त्र दलाच्या 122 कर्मचाऱ्यांची एक तुकडी भारतीय वायुसेनेच्या C-17 या विशेष विमानाने येत आहेत.
नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताचा दौरा रद्द केला आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जॉन्सन सहभागी होणार होते. जॉन्सन यांचा दौरा रद्द झाला असला तरी बांग्लादेशच्या जवानांची एक तुकडी यंदा प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या राजपथावरील परेडमध्ये सहभागी होणार आहे.(Bangladeshi soldiers will take part in the Republic Day parade)
भारतीय उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार बांग्लादेश सशस्त्र दलाच्या 122 कर्मचाऱ्यांची एक तुकडी भारतीय वायुसेनेच्या C-17 या विशेष विमानाने येत आहेत. 1971 च्या यद्धात भारतीय जवानांच्या बरोबरीने बांग्लादेशच्या या जवानांनी शौर्य दाखवत विजय मिळवला होता. आपल्या बहाद्दुर सैनिकांचा वारसा पुढे नेत ही तुकडी 26 जानेवारीला अर्थात प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होणार आहे. एखाद्या विदेशी सैन्याच्या तुकडीला आपल्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमध्ये सहभागी करुन घेण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी फ्रान्स आणि UAEच्या तुकड्या राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.
कोण-कोणत्या जवानांचा तुकडीत सहभाग?
राजपथावरील परेडमध्ये सहभागी होणाऱ्या बांग्लादेशच्या तुकडीतील जवान हे बांग्लादेशच्या सैन्यातील प्रतिष्ठित विभागातून येतात. 1, 2, 3, 4, 8, 9, 10 आणि 11 ईस्ट बंगाल रेजिमेंट आणि 1, 2 आणि 3 फिल्ड आर्टिलरी रेजिमेंटच्या जवानांचा त्यात सहभाग आहे. या दलाला 1971 च्या युद्धात सहभागी होणं आणि ते युद्ध जिंकण्याचा सन्मान प्राप्त आहे. या तुकडीमध्ये बांग्लादेशच्या नौदलाचे आणि वायूदलाचे अधिकारीही सहभागी आहेत.
बांग्लादेशी जवानांचा भारताच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमधील सहभाग हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण 2021 मध्ये मुक्तीसंग्रामाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. 50 वर्षांपूर्वी बांग्लादेश पाकिस्तानमधून बाहेर पडत स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला आला होता.
बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द झाला आहे. 5 जानेवारी रोजी जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून आपण येत नसल्याची माहती त्यांनी दिली. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे बोरिस यांनी भारत दौरा रद्द केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. खरंतर, भारतात प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी विविध देशाचे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. 2021 मधील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन उपस्थित राहणार होते. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारताचे निमंत्रण स्वीकारलं होतं. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंबंधी माहिती दिली होती.
बोरिस जॉन्सन यांची भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील उपस्थिती दोन्ही देशांमधील नव्या संबंधाचं प्रतीक होतं, असं जयशंकर म्हणाले होते. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना पुढील वर्षी होणाऱ्या जी-7 समिटमध्ये उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली होती.
संबंधित बातम्या:
Breaking : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द
इंग्लंडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन, बोरिस जॉन्सन यांची घोषणा
Bangladeshi soldiers will take part in the Republic Day parade