हरियाणात कोरोनाचा कहर!, 8 शाळांमधील 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, आरोग्य विभागात खळबळ
हरियाणा सरकारने दिलेल्या आदेशानुसार 2 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या. आरोग्य विभागानं दिवाळीपूर्वी काही सरकारी आणि खासगी शाळांमधील 837 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यात 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं.
रेवाडी: महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची चित्र आहे. मात्र दिल्ली, हरियाणामध्ये कोरोनाचा कहर सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. हरियाणातील रेवाडीमध्ये 5 सरकारी शाळा आणि 3 खासगी शाळांमधील 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि राज्याच्या आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे. या शाळांना पुढील 15 दिवस बंद ठेवण्याचे आणि शाळा सॅनिटाईज करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.(80 students in 8 schools in Haryana infected with corona)
हरियाणा सरकारने दिलेल्या आदेशानुसार 2 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या. आरोग्य विभागानं दिवाळीपूर्वी काही सरकारी आणि खासगी शाळांमधील 837 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यात 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं.
15 दिवसांसाठी शाळा बंद करण्याचे आदेश
शाळांमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर उपायुक्त यशेंद्र सिंह यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश कुमार यांना आवश्यक पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाची लागण झालेले विद्यार्थी सापडलेल्या शाळा पुढील 15 दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा उघडण्याचे निर्देश
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 नोव्हेंबर रोजी दिले आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अप्पर मुख्य सचिव वंदना क्रिष्णा यांच्यासह अन्य अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती.
जागतिक स्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारतां येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते. ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
‘शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जे मुल आजारी आहे किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये’ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.
‘शिक्षकांची तपासणी करणार’ – वर्षा गायकवाड
शाळा सुरू होण्यापुर्वी सर्व शिक्षकांची आर.टी.पी.सी.आर चाचणी ही 17 ते 22 नोव्हेंबर या दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली आहे. तर 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींगदेखील होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
संबंधित बातम्या:
दिवाळीनंतर नववी ते बारावीच्या शाळा उघडा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
शाळांची दिवाळीची सुट्टी वाढवली, आता पाच दिवसांऐवजी 14 दिवस सुट्टी
80 students in 8 schools in Haryana infected with corona