Ring Of Fire Solar Eclipse | कंकणाकृती सूर्यग्रहण येत्या रविवारी, 6 तास ग्रहणकाळ, सूर्यग्रहणाचं महत्त्व का?
यंदाच्या सूर्यग्रहणानंतर जगावर आणखी संकटांचा डोंगर कोसळेल, असेही दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. (Ring Of Fire Solar Eclipse)
मुंबई : येत्या रविवारी (21 जून) होणारं सूर्यग्रहण दोन कारणांनी चर्चेत आलं आहे. पहिलं म्हणजे भारतातून 6 महिन्यांच्या अंतराने दुसऱ्यांदा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. दुसरं म्हणजे सूर्यग्रहणानंतर जगावर अजून संकट येणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियात सुरु झाल्या आहेत. मात्र अजून एका वर्गाच्या दाव्यानुसार सूर्यग्रहण जगावरचं सर्वात मोठं संकट ठरलेल्या ‘कोरोना’ला निष्प्रभ करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे यंदाचं सूर्यग्रहण आठवड्याभर आधीपासून चर्चेत आहे. (Ring Of Fire Solar Eclipse)
महाराष्ट्रासह देशभरात सूर्यग्रहण दिसणार आहे. जवळपास 6 तास सूर्याला ग्रहण लागणार असून सकाळी नऊ वाजता लागणारे ग्रहण तीन वाजता सुटेल. सूर्याला ग्रहण लागल्यामुळे अंधार पडणार आहे. जून आणि जुलै दरम्यान दोनवेळा ग्रहण लागणे सर्वसाधारण आहे, पण क्वचितच घडणारा तीन ग्रहणांचा योग यावेळी घडणार आहे. यामध्ये दोन चंद्रग्रहणं, तर एका सूर्यग्रहणाचा समावेश आहे.
हिंदू जनजागृती समितीच्या मते यंदाचं सूर्यग्रहण कोरोनापासून दिलासा देईल. काही दिवसांपू्र्वी चेन्नईच्या एका शास्त्रज्ञाने काही खगोलीय घटनांचा आधार देत सूर्यग्रहण आणि कोरोनाचा संबंध जोडला होता. मात्र त्या दाव्याला काही शास्रज्ञ आणि काही ज्येष्ठ पंचागकर्त्यांनी सपशेल चुकीचं ठरवलं.
दरम्यान, यंदाच्या सूर्यग्रहणानंतर जगावर आणखी संकटांचा डोंगर कोसळेल, असेही दावे केले जात आहेत. कारण, यंदा सूर्यग्रहणाबरोबरच 6 ग्रह वक्रस्थितीत जात आहेत. म्हणजे राहू, केतु यासोबतच बुध, शुक्र, शनि, मंगळ हे ग्रह वक्र स्थितीत असतील. त्यामुळेच सूर्यग्रहण अधिक प्रभावशाली ठरणार असल्याचं बोललं जात आहे.
दोन देशांमधले तणाव, पूर, भूकंप, अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढीचा अंदाज आहे. मात्र अशा कोणत्याही दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलं आहे.
The Most Dramatic ‘Ring Of Fire’ Solar Eclipse For A Decade Will Strike This Weekend https://t.co/pd5gEk19hX pic.twitter.com/SPlGF8OnzP
— Travel + Leisure (@TravelLeisure) June 16, 2020
महाराष्ट्रात साधारण रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून सूर्यग्रहण दिसेल. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये एका रेषेत येणार असल्याने कंकणाकृती सूर्यग्रहण होतं. मात्र सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता फिल्टर चष्मे, फिल्म आणि दुर्बिणीच्या सहाय्याने पाहण्याचं आवाहन केलं जात आहे.
पृथ्वीवरच्या कुठल्याही मोठ्या संकटानंतर जशी डोळसपणे विचार करणाऱ्यांची संख्या वाढते, तशीच अंधश्रद्धाही वाढण्याची भीती असते. कोरोनानंतर आलेली अतिवृष्टी, नंतर आलेला पूर, धडकी भरवणारं चक्रीवादळ, पिकांवर पडलेली टोळधाड आणि आता भारत-चीनमधला वाद… यंदा एका मागोमाग एक संकटांची रांग लागली. सूर्यग्रहणाने कोरोना कमी होवो अथवा न होवो. मात्र आपल्या कोरोनोविरोधातल्या लढाईला ग्रहण लागू न देता कोरोनाच्या अंताचा लढा चालू ठेवायलाच हवा. (Ring Of Fire Solar Eclipse)
*सूर्यग्रहणाबाबत ‘टीव्ही 9 मराठी’वर सर्वात मोठी चर्चा आज (शुक्रवार 19 जून) दुपारी 4 वाजता होत आहे*