तेजस्वी यादवांना बिहारचे CM करा, नितीश कुमारांना PM पदाचे उमेदवार करु, राजदची ऑफर
राष्ट्रीय जनता दलाचे दिग्गज नेते उदय नारायण चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ही ऑफर दिली.
पाटणा : बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला नाही, तोच सत्ताधारी एनडीएमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपने शब्द पाळत नितीश कुमार (Nitish Kumar) यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली खरी, मात्र अरुणाचल प्रदेशात आमदार फोडून भाजपने जेडीयूला धक्काच दिला आहे. एनडीएमध्ये खेचाखेची सुरु होताच विरोधकांच्या गोटातही चुळबूळ सुरु झाली. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमारांनी खुली ऑफरच दिली आहे. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची द्या, आम्ही तुम्हाला पंतप्रधानपदाचे उमेदवार करतो, असा प्रस्ताव राजदने ठेवल्याची माहिती आहे. (RJD offered PM Candidature to Nitish Kumar 2024 polls want Bihar CM Post for Tejashwi Yadav)
राष्ट्रीय जनता दलाचे दिग्गज नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ही ऑफर दिली. ‘जर नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री केलं, तर 2024 मधील पंतप्रधानपदाच्या शर्यतीसाठी विरोधी पक्ष त्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतील’ असा प्रस्ताव चौधरींनी दिल्याचं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.
राजदने सत्तेत येण्याची आशा अजूनही सोडलेली दिसत नाही. पुन्हा एकदा नितीश कुमार यांची साथ देण्याची त्यांची तयारी आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये अरुणाचल प्रदेशात गेलेला तडा निमित्त ठरला आणि नितीश कुमारांना दिल्लीला पाठवण्याचा प्रस्ताव राजदने ठेवला.
बिहारमध्ये भाजपचा वरचष्मा
243 जागा असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या वाट्याला 125 जागा आल्या. यापैकी भाजपने 74 जागा जिंकल्या, तर जेडीयूला केवळ 43 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला जेडीयूपेक्षा खूप जास्त जागा मिळूनही भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळला आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिलं. नितीश कुमारांच्या कॅबिनेटमध्ये भाजपने जड मंत्रिपदं आणि दोन उपमुख्यमंत्रिपदं राखत वरचष्मा राखण्याचा प्रयत्न केला आहे. (RJD offered PM Candidature to Nitish Kumar 2024 polls want Bihar CM Post for Tejashwi Yadav)
जेडीयूच्या नव्या अध्यक्षांचा भाजपला टोला
पाटण्यात झालेल्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या जागी आरसीपी सिंह यांना जेडीयूचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात आले. 2010 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूचा स्ट्राईक रेट 90 टक्के होता, अशी आठवण करुन देत आरसीपी सिंह यांनी स्ट्राईक रेटवरुन डिवचणाऱ्या भाजपलाच लक्ष्य केलं. जेडीयूचा स्ट्राइक रेट चांगला असूनही निवडणुकीपूर्वी झालेल्या करारानुसार मंत्रिपदांचं वाटप करण्याचं नितीशकुमारांनी 2010 मध्ये सांगितलं होतं, याकडे आरसीपी सिंह यांनी लक्ष वेधलं.
आमचा पक्ष कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसत नाही, आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची संधीही कोणाला देत नाही, असंही आरसीपी म्हणाले. अरुणाचल प्रदेशातील राजकीय घडामोडींचा संबंध या वक्तव्याशी जोडला जातो. एकीकडे एनडीएची युती मजबूत असल्याचा दावा केला जातो, मात्र जेडीयू-भाजपच्या वादात राजदने आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला, यात शंका नाही.
संबंधित बातम्या :
बिहारचं भाजप सरकार धोक्यात? नितीश कुमारांची आर पारची भाषा
भाजपने सहा आमदार फोडले; तरीही नितीश कुमार यांना फरक का पडत नाही?
(RJD offered PM Candidature to Nitish Kumar 2024 polls want Bihar CM Post for Tejashwi Yadav)