आलीशान वंदेभारत एक्सप्रेसच्या छताला गळती, सोशल मीडियावर हंगामा, रेल्वेने केला खुलासा

| Updated on: Jul 04, 2024 | 2:03 PM

आलीशान आणि वेगवान वंदेभारत एक्सप्रेसच्या छतातून गळती होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मिडियावर हंगामा झाला आहे. या संदर्भात सोशल मिडीयावर पोस्ट होताच रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.

आलीशान वंदेभारत एक्सप्रेसच्या छताला गळती, सोशल मीडियावर हंगामा, रेल्वेने केला खुलासा
Vande bharat Express
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

नवी दिल्ली – आलिशान वंदेभारत एक्सप्रेसच्या छतातून पाणी गळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्हीआयपी लोकांच्या पसंद असलेल्या या वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी मागे आल्या होत्या. तर कधी या ट्रेनमधून एसटीसारखी गर्दी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता थेट पावसाचे पाणी छतातून गळत असल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणात प्रवाशांनी सोशल मिडीयावर तक्रार केली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ

वंदेभारत एक्सप्रेसमधून प्रवास करताना एका डब्याच्या छतातून गळती होत असल्याची तक्रार सोशल मिडीयावर प्रवाशांनी टाकली आहे. या संदर्भात रेल्वेने तातडीने उत्तर दिले आहे. पाईपमध्ये अडथळा आल्याने कोचमध्ये थोडे पाणी गळाल्याचे रेल्वेने म्हटले आहे. ही समस्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने काम करून पाणी गळती लागलीच थांबविली असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. तसेच रेल्वेने प्रवाशांना झालेल्या मनस्तापाबद्दल खेद व्यक्त केला आहे.

नेमके काय प्रकरण

वंदेभारत एक्सप्रेस ट्रेन दिल्ली ते वाराणसी असा प्रवास करताना हा प्रकार उघडकीस आला होता. एका डब्याच्या छतातून पाणी गळती सुरु होती.त्यामुळे प्रवाशांची अडचण झाली. या संदर्भात तक्रार केल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले.

येथे पाहा पोस्ट –

सोशल मिडियावर हंगामा

रेल्वेने आलिशान वंदेभारत एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 22416 मधील छतातून पाण्याची गळती होत असल्याचा धक्कादायक प्रकार सोशल मिडीयावर लागलीच व्हायरल झाला. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या या महागड्या गाडीची अशी अवस्था कशी काय झाली अशी टिकाटीपण्णी करायला सुरुवात केली. मागे वंदेभारतचे उद्घाटन झाले तेव्हा या गाडीने गुरांना उडविल्याने तिच्या कोचच्या पुढील मोटर केबिनच्या एअरो डायनामिक भागाचे नुकसान झाल्याने ही ट्रेन सोशल मिडीयावर चेष्टेचा विषय झाली होती.