बाप पळवतात, आता मुलंही पळवायला लागले, देसाई यांचा मुलगा शिंदे गटात का गेला?; राऊत यांनी सांगितलं कारण
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. मिंधे गट आधी बाप पळवायचा. आता मुलं पळवत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून ते बोलत होते.
नवी दिल्ली : ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हा काही धक्का वगैरे नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भूषण देसाई शिंदे गटात का गेले याचं कारणही राऊत यांनी सांगितलं आहे. तसेच मिंधे गट पूर्वी बाप पळवत होता. आता मुलंही पळवायला लागला, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओ प्रकरणीही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणात पुरुष आमदाराचं काही म्हणणं असेल ना? ते कुठे आहेत? असा सवाल राऊत यांनी केला.
सुभाष देसाई यांच्या चिरंजीवाने शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे चिरंजीव भूषण देसाई यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. सुभाष देसाई यांनी याबाबतचं सविस्तर निवेदन दिलं आहे. देसाई यांच्या मुलाचा शिवसेनेशी संबंध नसतानाही भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. मिंधे गट कधी बाप पळवतात. आता मुलंही पळवायला लागले आहेत. बाप आणि मुलं पळवण्याची ही मेगा भरती सुरू आहे. पण ती कूचकामी ठरेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
देसाई आदर्श नेते
भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश का केला? याचं कारणही त्यांनी सांगितलं. सामंत लोणीवाले हे राज्यातील मंत्री आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी भूषण देसाईंवर आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचे आदेशही दिले होते. त्याचं काय झालं? त्याचं उत्तर देणार की नाही? तुम्ही आधी यावर उत्तर द्या, मगच आम्ही उत्तर देऊ, असं राऊत म्हणाले. तसेच सुभाष देसाई हे पक्षातील ज्येष्ठच नव्हे तर आदर्श नेते आहेत. त्यांचे चिरंजीव तिकडे गेल्यानने मूळ शिवसेनेवर काहीच परिणाम होणार नाही. भविष्यात या ओझ्यांचं काय करायचं? असा प्रश्न मिंधे गटालाच पडेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
काहीच फरक पडत नाही
दरम्यान, कोल्हापुरातले संग्राम थिटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. थिटे कुठेही गेले तरी त्याचा शिवसेनेच्या वाढीवर किंवा विस्तारावर काही परिणाम होणार नाही. एकदा संघर्षाला उतरल्यावर अशा प्रसंगांना सामोरं जाणं हे योद्ध्यांचं कर्तव्य असतं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या प्रसंगांना सामोरं जाणार आहोत. त्यामुळे थिटे यांच्या भाजप प्रवेशाने काहीच फरक पडत नाही, असंही ते म्हणाले.
पुरुष आमदार कुठे आहेत?
शीतल म्हात्रे प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणातील व्हिडीओ खरा की खोटा याची चौकशी झाली पाहिजे. तसेच या प्रकरणात पुरुष आमदारांची काही तक्रार आहे का? हेही पाहावं लागेल. पुरुष आमदार कुठे आहेत? त्यांची बदनामी झालीय का? असे खोचक सवालही त्यांनी केला.