Sanjay Raut: सोमय्या विकृत माणूस, त्यांच्या नादाला लागू नका; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut: राज ठाकरे यांनी एका रात्रीत भूमिका बदलली. एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले, असा टोला राऊत यांनी लगावला.
नवी दिल्ली: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून राऊत यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. सोमय्या हा विकृत माणूस आहे. त्यांच्या नादाला लागू नका. सोमय्यांनी 1 हजार कोटींचा दावा दाखल करावा. प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. सोमय्या घोटाळेबाज माणूस आहे. त्यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्या संशयास्पद आहेत, असं संजय राऊत म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांचे रिसॉर्ट पाडायला सोमय्या यांनी राष्ट्रपतीना भेटावं किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावं. तो त्यांचा प्रश्न आहे. सोमय्या यांची शरम वाहत चालली आहे, तो विकृत माणूस आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे राऊत दिल्लीत असून सोमय्याही दिल्लीत आहेत.
संजय राऊत यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांनी एका रात्रीत भूमिका बदलली. एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच देशात साधू कोण आहेत? कुणी उठत त्याला साधू म्हणायचं का? असा सवाल करतानाच राज ठाकरे यांनी अयोध्येत घर बांधाव, असा खोचक सल्लाही राऊत यांनी दिला, भाजपचे खासदार बृजभूषणसिंह यांना मी ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे, त्यांना आम्ही नेताजी म्हणतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तक्रार काय?
शिवडी न्यायालयात सोमय्या यांनी राऊतांविरोधात अब्रनुकसानीचा दावा केला आहे. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. शिवसेना नेते संजय राउत यांनी दहशत/भीती निर्माण करण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचे खोटे आरोप करत आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावीय. तसेच खटला दाखल करून घेण्यात यावा, अशी विनंती कोर्टाला करण्यात आल्याचं प्रा. डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी सांगितलं. भारतीय दंड संहिता कलम 499 व 500 च्या अंतर्गत संजय राउत यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी विनंती शिवडी येथील मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट 25 नं. न्यायालय येथे प्रा. डॉ. मेधा सोमय्या यांनी केली
न्यायालयाने याचिका/तक्रार दाखल करून घेतली आहे. प्रक्रिया प्रारंभ झाली. पुढची सुनावणी 26 मे रोजी होणार आहे. वकील विवेकानंद गुप्ता, वकील लक्ष्मण कनाल, वकील अनिल गलगली यांनी सोमय्या यांची बाजू मांडली होती.
सोमय्यांची टीका
संजय राऊत महागाईवर बोलत नाहीत. ठाकरे सरकार बदमाश आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 31 जानेवारी 2022 रोजी एक आदेश जारी केला होता. त्यानुसार मालक अनिल परब यांनी 90 दिवसांत रिसॉर्ट हटवणे, पाडणे आवश्यक आहे. पण रिसॉर्ट आजही पाडले नाही. दापोलीतील बेकायदेशीर रिसॉर्ट्स पाडण्यासाठी सोमय्या केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांना भेटणार आहेत.