बाळासाहेब थोरात यांनी बंडाची भूमिका घेतली, याचा अर्थ नक्कीच ते…; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया काय?
राहुल गांधींचे भाषण मी ऐकलं. ते प्रखर सत्य सांगणारं होतं. वेगळ्या राहुल गांधी यांचा साक्षात्कार काल झाला. भाषणातील मुद्द्यावर काही लोकांचे मतभेद असू शकतात. पण त्यांनी जी मांडणी केली.
नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे. थोरात यांनी अचानक निर्णय घेतल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, बाळासाहेब थोरात शांत आणि संयमी आहेत. चारित्र्य संपन्न नेते आहेत. त्यांनी बंडाची भूमिका घेतली म्हणजे नक्कीच ते मनातून दुखावले असणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कुटुंबांना मी ओळखतो. त्यांच्या नसानसात काँग्रेस आहे. त्यांनी राजीनामा देणं हा त्यांच्या पक्षांतर्गत वाद आहे. आम्ही भाष्य यासाठी करतो कारण काँग्रेस महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष आहे. त्यांच्या पक्षात स्थिर स्थावर असावं असं वाटतं. या प्रश्नात काँग्रेस हायकमांड लक्ष घालेल. या वादावर आम्ही बोलणं योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.
पक्ष त्यांची भूमिका जाणून घेईल
संयमी आणि स्वच्छ चारित्र्यांचे थोरात हे नेते आहेत. थोरातांसारख्या नेत्याने बंडाची भूमिका घ्यावी याचा अर्थ नक्कीच ते मनातून दुखावले आहेत. अस्वस्थ आहेत. म्हणून त्यांची भूमिका त्यांचा पक्ष जाणून घेईल. एवढंच बोलू शकतो, असं ते म्हणाले.
म्हाळगी संस्थेला टाळे?
भाजपने बाळासाहेब थोरात यांना ऑफर दिली आहे. त्यावरही राऊत यांनी खोचक टीका केली. भाजप कुणालाही सामावून घ्यायला तयार असतो. त्यांच्या पक्षात कोणी उरले नाही. रिकाम्या जागा भरण्याचं काम सध्या सुरू आहे.
रामभाऊ म्हाळगीतील कार्यकर्ते घडवण्याच्या उद्योगाला, संस्थेला टाळे लावलेले दिसते. त्यामुळे इतर पक्षातील रेडिमेड कार्यकर्ते घेऊन आपला पक्ष पुढे नेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
कसब्यातही उमेदवार नाही
भाजप शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेत आहे. मूळचा भाजप आहेच कुठे? इथून तिथून हवसे नवशे गवशे घेऊनच त्यांचा पक्ष उभा आहे. मूळ विचाराचा पक्ष कुठे आहे? त्यावर चंद्रशेखर बावनुकुळे यांनी बोललं पाहिजे.
आम्ही घडवलेले कार्यकर्ते घेऊन पक्ष वाढवत आहात. तुमच्याकडे नवीन कार्यकर्ते कुठे आहेत? कसबा आणि चिंचवडमध्येही भाजपकडे स्वत:चे उमेदवार नाहीयेत, असा चिमटा त्यांनी काढला.
भाजप आवाज करू शकला नाही
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणाला क्रांतीकारक भाषण असं संबोधलं. राहुल गांधींचे भाषण मी ऐकलं. ते प्रखर सत्य सांगणारं होतं. वेगळ्या राहुल गांधी यांचा साक्षात्कार काल झाला.
भाषणातील मुद्द्यावर काही लोकांचे मतभेद असू शकतात. पण त्यांनी जी मांडणी केली. त्यामुळे भाजप फार आवाज करू शकला नाही. राहुल गांधी ज्या पद्धतीने काम करत होते त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे, असं ते म्हणाले.
सत्य बोलण्यासाठी हिंमत लागते
राहुल गांधी यांचं कालचं भाषण क्रांतीकारक होतं. सत्य बोलणं हे क्रांतीकारक काम असतं. सत्य बोलण्यासाठी हिंमत लागते. बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने सत्य बोलले तसेच राहुल गांधी काल बोलले, असंही ते म्हणाले.