उद्या म्हणतील माझ्यामुळेच बाळासाहेब ठाकरे ‘शिवसेनाप्रमुख’, इनफ इज इनफ… संजय राऊत यांनी कुणाला फटकारलं?
आमचं नाणं खणखणीत आहे. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. खोटं बोलायचं नाही. मी खासदार केलं हे किती हस्यास्पद विधान आहे. तुम्हाला मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंनी केलं.
नवी दिल्ली: नारायण राणे म्हणतात 2004 साली त्यांनी मला खासदार केलं. मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे काय करत होते? राणे हे काय एका पक्षाचे प्रमुख होते का? राणे हे शिवसेना प्रमुख होते का? असा सवाल करतानाच बाळासाहेब ठाकरे यांना मीच शिवसेनाप्रमुख म्हणून नेमलंय एवढचं त्यांनी बोलायचं बाकी ठेवलं आहे. ते कोणतीही भन्नाट विधाने करू शकतात, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत यांना मीच खासदार बनवलं होतं. त्यांचं मतदार यादीतही नाव नव्हतं. त्यांना खासदार करण्यासाठी मीच खर्च केला होता, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. त्यावर संजय राऊत यांनी पलटवार करताना राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच राणेंविरोधात मानहानीचा खटला दाखल केल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे राणे विरुद्ध राऊत हा वाद विकोला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचे पोपटलाल
नारायण राणे असतील किरीट सोमय्या असतील किंवा अन्य कोणी असतील या नेत्यांना मी भाजपचे पोपटलाल म्हणतो. हे फक्त पोपटासारखे बोलत असतात. मागचा पुढचा विचार न करता ते बोलत असतात. या प्रत्येकाला कायदेशीर नोटीस पाठवून त्यांना उत्तर द्यायला लावू. सत्य काय हे सांगायला लावू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
इनफ इज इनफ
हे लोक भन्नाट आरोप करत असतात. बिनबुडाचे आरोप करत असतात. आमच्याबद्दलची बेसलेस विधान करत असतात. आता वेळ आली आहे. इनफ इज इनफ. ठिक आहे. कायदेशीर लढाया लढू. इतरही लढाया लढू, असंही ते म्हणाले.
मी काय बांगलादेशी आहे काय?
2004 मध्ये माझी स्वतंत्र ओळख होती. मी सामनाचा संपादक होतो. त्या आधीही सामनाचा संपादक म्हणूनच मी काम करत होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की, माझं मतदार यादीत नाव नव्हतं. मी गेली 25 वर्ष मतदान करत होतो.
त्या आधीच्या सर्व निवडणुकीत मी मतदान केलं आहे. मी काय बांगलादेशी नागरिक आहे का? की पाकिस्तानी? हा एक कॉमन सेन्स आहे. मी या देशाचा नागरिक आहे. मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, असं त्यांनी सांगितलं.
खटला दाखल करणार
माझं शिक्षण विद्यापीठातून झालंय. अनेक निवडणुकात मी मतदान केलं. 2004 सालीही माझं नाव मतदार नोंदणी यादीत होतंच. राणे खोटं बोलत आहेत. त्यांनी माझा उमेदवारी अर्ज पाहावा. यादी चेक करावी. भाजपच्या नादाला लागून माणसानं किती खोटं बोलावं. मी त्यावर अधिक बोलणार नाही.
त्यांनी माफी मागितली नाही तर मी त्यांच्यावर खटला दाखल करेल. सोमय्यांवर खटला दाखल करणार आहे. शिवसेनेच्या ज्या ज्या लोकांवर आरोप केले जात आहेत. तेही खटला दाखल करतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
चारआण्याची लायकी नाही
इतरांसारखं मी पैशासाठी खटला दाखल करत नाही. यांची चारआण्याचीही लायकी नाही. चंद्रकांत पाटील यांच्यावर मी सव्वा रुपयाचा खटला दाखल केला होता. मला पैसे नको. मी मध्यमवर्गीय माणूस आहे. माझ्या पक्षाची प्रतिष्ठा, माझ्या पक्षप्रमुखांची प्रतिष्ठा यासाठी मी त्यांना कोर्टात खेचणार. त्यांनी कोर्टात उत्तर द्यावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.
आमच्यावर ठाकरेंचे संस्कार
आमचं नाणं खणखणीत आहे. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. खोटं बोलायचं नाही. मी खासदार केलं हे किती हस्यास्पद विधान आहे. तुम्हाला मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंनी केलं. तुम्हाला विरोधी पक्षनेता बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आम्हाला सर्व पद बाळासाहेबांनी दिली. नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. याचं भान आणि जाणीव राखायला हवी, असंही ते म्हणाले.