मुख्यमंत्र्यांची परत अशी बेअब्रू होऊ नये… संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले
कोणी काही म्हणू द्या. मुख्यमंत्री काल आव्हानाच्या आवेशात वरळीत गेले. शेवटी खुर्च्या उचलण्याची वेळ आली अन् थातूरमातूर कार्यक्रम करून उरकला गेला.
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या सभेला कमी गर्दी झाली होती. अनेक लोक सभेतून निघून जाताना दिसत होते. त्यामुळे शिंदे गटामध्ये चिंतेचं वातावरण असतानाच या सभेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. कालच्या सभेचा पचका झाला. मुख्यमंत्र्यांची परत अशी बेअब्रू होऊ नये, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत नवी दिल्लीत आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रत्येत नेत्याला तो ज्या पदावर आहे त्या पदाच्या भूमिकेत शिरावं लागतं. मी मुख्यमंत्री, राज्यपाल आहे. पंतप्रधान आहे, या भूमिकेत न शिरता जे काम करत आहेत. त्यांचा मग पचका होतो. तो काल वरळीत झाला. राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. तरीही हिन दर्जाच्या राजकारणात मुख्यमंत्री पडत असतील आणि त्यासाठी सत्ता वापरणार असतील तर जनता सर्व पाहत असते. मग जनता अशा मुख्यमंत्र्यांकडे पाठ फिरवते. हे काल वरळीत पाहिलं असेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
फुटीर गटाचे नेते होता काय?
कोणी काही म्हणू द्या. मुख्यमंत्री काल आव्हानाच्या आवेशात वरळीत गेले. शेवटी खुर्च्या उचलण्याची वेळ आली अन् थातूरमातूर कार्यक्रम करून उरकला गेला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होऊ नये या मताचे आम्ही आहोत. त्या पदावर जरी आमचे विरोधक असले, गद्दार बेईमान बसले असले तरी ती मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आहे.
तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आला होता की आव्हानाची भाषा करणारे फुटीर गटाचे नेते म्हणून आला होता? याचा विचार आता या सर्वांनी केला पाहिजे, असा चिमटा राऊत यांनी काढला.
कोळी समाज शिवसेनेसोबतच
कोळीवाडे, कोळीसमाज हे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेसोबत ठामपणे उभे आहेत. आम्ही कोळीबांधवांसाठी काम केलं आहे. मुंबईतील सर्व प्रमुख जातीपाती, पंथ, धर्माचा विचार न करता आम्ही काम केलं आहे. कोळीबांधव मूळचे रहिवाशी आहेत.
ते शिवसेनेसोबत आहेत. हे काल सिद्ध झालं, असं सांगतानाच मला कुणावर टीका करायची नाही. पण अशी बेअब्रू परत राज्याच्या मुख्यमंत्र्याची होऊ नये याची काळजी त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने घेतली पाहिजे, असा चिमटा त्यांनी काढला.
एका रात्रीत काय घडलं?
आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर काल हल्ला झाला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. हे सरकार गेल्यापासून आमच्यासुरक्षेबाबत जी भूमिका घेतली ती धक्कादायक आहे. आदित्य ठाकरे हे प्रमुख नेते आहेत. त्यांची सुरक्षा पाहिली पाहिजे. उद्धव ठाकरे आणि आमची सर्वांची सुरक्षा काढली. हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. आमची सुरक्षा काढून घेता असं अचानक एका रात्री काय घडलं? असा सवाल त्यांनी केला.
उत्तर द्यावं लागेल
अचानक भाजप आणि मिंधे गटाच्या मागे पुढे पोलिसांच्या चार चार गाड्या मिरवता आणि फिरवता. त्यांना कुणापासून धोका आहे? जनतेचे प्रतिनिधी आहेत ना? मग त्यांना इतकी सुरक्षा? त्या उलट इतर पक्षाचे आमदार, खासदार, नेते आहेत. त्यांची तुम्ही 100 टक्के सुरक्षा काढून घेता याचं उत्तर त्यांना भविष्यात द्यावं लागेल, असं ते म्हणाले.
काळजी घेतली पाहिजे
मी प्रार्थना करतो भविष्यात दुर्देवी घटना घडू नये. आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत काल मराठवाड्यात झालेला प्रकार हा दुर्देवी आहे. अंबादास दानवे यांनी त्यावर भाष्य केलं आहे. पण सरकारने यापुढे काळजी घेतली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.