हा हा हा हा… कौन राहुल? ये है राहुल!; ‘तो’ फोटो शेअर करत संजय राऊत यांची मोदींवर बोचरी टीका
Sanjay Raut Tweet About Rahul Gandhi : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राहुल गांधी यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय. राहुल गांधी यांचा हा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय? वाचा...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक फोटो संजय राऊत यांनी शेअर केलाय. हा हा हा हा… कोण राहुल गांधी? हे आहेत राहुल गांधी…! हा तर केवळ ट्रेलर आहे. पुढे – पुढे बघा काय होतं ते…, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. राहुल गांधी ओम बिर्ला यांचं अभिनंदन करतानाचा फोटो संजय राऊत यांनी शेअर केला आणि भाजप आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी टोला लगावला आहे. भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेला संजय राऊत यांनी या फोटोच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
18 व्या लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. काल आणि आज लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. एनडीचे उमेदवार ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीचे कोडीकुन्निल सुरेश यांच्यात लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडी दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं. यावेळचा राहुल गांधी यांचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
हा हा हाहा कौन राहुल? ये है राहुल! ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो होता है क्या?@RahulGandhi @BJP4India pic.twitter.com/FFbzQditKS
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2024
संजय राऊत काय म्हणाले?
भाजपचे नेते ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संजय राऊत यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली. यावेळी ओम बिर्ला यांनी एका झटक्यात 100 पेक्षा जास्त खासदारांना निलंबित केलं होतं. आणीबाणीच्या काळातही तसं झालं नव्हतं. लोकसभेच्या उपाध्यक्षपदाबाबत आमची चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना हे पद मिळायला हवं. याबाबत चर्चा होत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर संजय राऊत यांनी एक ट्विट केलं. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊतांनी राहुल गांधी यांचं अभिनंदन केलं आहे. राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते झाले आहेत. धन्यवाद राहुलजी…! तुम्ही या संविधानिक पदाचा स्विकार केलात. देशाला मजबूत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंत. आपण सगळे सोबत लढूयात आणि जिंकूयात…, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.