238 वेळा पडला, पण पठ्ठ्याने नाद नाही सोडला, लोकसभेच्या रिंगणात ठोकले शड्डू
K. Padmaranjan : निवडणुकीचा हंगाम आला की देशातील काही जणांच्या मनात कोण उकळ्या फुटतात, काय सांगवं. तामिळनाडूतील या उमेदवाराची अशीच चर्चा होते. कारण त्याने 10,20 वेळा नाही तर निवडणुकीत 238 वेळा पराभवाचा सामना केला आहे. जगात सर्वाधिक वेळा निवडणूक हारण्याचा विक्रमच त्याच्या नावे जमा झाला आहे.
जगातील कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत कशासाठी उतरतो? तुम्ही म्हणाल अहो हा काही प्रश्न आहे का? निवडणुकीच्या आखाड्यात जिंकण्यासाठीच उतरत असतात. कोणाला वाटते आपण पराभूत व्हावे, नाही का. पण तामिळनाडूतील हा उमेदवार मात्र त्याला अपवाद आहे. ही व्यक्ती निवडणूक जिंकण्यासाठी नाही तर हारण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरते. या व्यक्तीने 10, 20 नाही तर आतापर्यंत 238 वेळा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे. म्हणजे तो 238 वेळा पराभूत झाला आहे. तरीही ही व्यक्ती लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उतरणारच आहेत. कोण आहे ही व्यक्ती, कोणता रेकॉर्ड आहे त्यांच्या नावे?
के.पद्मराजन यांनी यशाचे तोंड पाहिलेच नाही
देशभरात निवडणुकीचा फड रंगला आहे. दिवसागणिक त्याची उत्सुकता वाढत आहे. तामिळनाडूमधील के पद्मराजन हे निवडणूक आली की सक्रिय होतात. 65 वर्षीय पद्मराजन यावेळी पुन्हा लोकसभा निवडणुकीत त्यांचे नशीब आजमावणार आहेत. तामिळनाडूमधील मेट्टूरचे पद्मराजन यांचा टायर रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. 1988 पासून ते निवडणूक लढवत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते धर्मपुरी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. इलेक्शन किंग नावाने प्रसिद्ध असलेले पद्मराजन यांनी राष्ट्रपती निवडणुकीत सुद्धा नशीब आजमावलं आहे.
पहिल्यांदा लोकांनी काढले वेड्यात
पद्मराजन हे पहिल्यांदा निवडणूक आखाड्यात उतरले. तेव्हा लोकांनी त्यांची टर उडवली. त्यांच्यावर लोक हसले. सामान्य नागरिकाने निवडणूकीपासून चार हात लांब असावे, असा समज आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील व्यक्ती कधी निवडणूक लढवू शकत नाही, या समजाला त्यांनी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा छेद दिला. या मानसिकतेविरोधात त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली.
- सर्वांविरोधात ठोकले शड्डू – पद्मराजन यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीपासून ते मोदीपर्यंत त्यांनी अनेकांविरोधात निवडणूक लढवली. त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली आहे.
- तीन दशकांत एक कोटींहून अधिकचा खर्च – पद्मराजन यांच्या मते, त्यांच्यासमोर कोण उमेदवार आहे, याची त्यांनी कधीच चिंता केली नाही. मला पराभवाचा हा काफिला पुढे न्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीन दशकांत त्यांनी कित्येक निवडणूका लढविल्या. या तीन दशकांत एक कोटींहून अधिकचा खर्च केला. यामध्ये अमानत रक्कमेचा पण समावेश आहे. पराभव झाल्यानंतर अमानत रक्कम जप्त होते.
- लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव – पद्मराजन यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवल्या गेले आहे. ते भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार ठरले आहेत. त्यांनी 2011 मध्ये त्यांनी निवडणुकीत सर्वात जोरदार प्रदर्शन केले. मेट्टूर विधानसभा निवडणुकीत त्यांनी 6,273 मतं मिळवली होती. या ठिकाणाहून विजयी उमेदवाराला 75 हजारांहून जास्त मतदान मिळाली होती.