नोएडा / 16 जुलै 2023 : सध्या देशभरात पाकिस्तानातून भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर प्रकरण चर्चेत आहे. आपल्या प्रियकरासाठी सीमा हैदर ही महिला आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली. सीमा भारतात आल्याचे उघड होताच पोलिसांनी कारवाई करत तिच्या प्रियकरासह तिला अटक केली. यानंतर जामिनावर त्यांची सुटकाही केली. मात्र या प्रकरणामुळे देशभरात चर्चांना उधाण आले. पाकिस्तानी मीडियाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर पाकिस्तान सरकारने आपली प्रतिक्रिया दिली होती. यानंतर सीमाने एक व्हिडिओ जारी करत पाकिस्तानला उत्तर दिले आहे.
पाकिस्तानसाठी जारी केलेल्या व्हिडिओत कडक शब्दात उत्तर दिले आहे. सीमा म्हणाली, ‘माझा एक व्हिडिओ पाकिस्तानींसाठी आहे. हवं ते करा. पाहिजे तितके आरोप करा. येथील एजन्सी प्रत्येक बाब क्लिअर करत आहे. इथे सर्व बाबी क्लिअर होताच मी माझा पती सचिनसोबतच राहणार आणि त्याच्यासोबत जगणार आणि त्याच्यासोबतच मरणार.’ ‘कुणी काहीही म्हणो, काहीही होऊ शकत नाही. कारण माझे प्रेम, माझे सर्वस्व माझा सचिनच आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि हो, मी हिंदू आहे, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. मी भारतात आले, एक दिवस सगळे माझे प्रेम स्वीकारतील’, असेही सीमा म्हणाली.
सीमा हैदर आता भारतालाच आपला देश मानते. नेपाळमध्ये मंदिरात तिने सचिनसोबत विवाह केल्याचा दावा केला आहे. सचिनच्या कुटुंबीयांना सीमाला कुणाला भेटण्यास मनाई केली आहे. सीमा दिवसातील 18 तास सोशल मीडिया आणि मीडियाशी संवाद करण्यात घालवते. यामुळे ती खाण-पिणं करु शकत नाही. परिणामी तिची तब्येत बिघडत चालली आहे, असे सचिनच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.