बिहार | 7 नोव्हेंबर 2023 : विधानसभेत जातीवर आधारित सर्वेक्षणाची आकडेवारी सादर करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री असे काही बोलले ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शेजारी बसलेले आमदारही अस्वस्थ झाले, काही नाराज झाले तर काही आमदार हसत होते. मुख्यमंत्री यांच्या या विधानामुळे महिला आमदार संतप्त झाल्या. बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी असं धक्कादायक विधान धक्कदायक विधान केलं.
बिहारमध्ये जातीवर आधारित सर्वेक्षणाची आकडेवारी सादर करण्यात आली. यावर विधानसभेत चर्चा सुरु झाली. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका वक्तव्यावरून वाद सुरू झाला. लोकसंख्या नियंत्रण आणि महिला शिक्षणावर मुख्यमंत्री नितीश यांनी केलेल्या विधानावर विधानसभेतील आमदारही नाराज दिसले.
बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती कशी वाढवली जाईल याची रूपरेषाही तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील आरक्षणाची व्याप्ती ५० वरून ६५ करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला. EWS च्या 10 टक्के समावेश करून आरक्षण 75 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानुसार अनुसूचित जातींसाठी सध्या उपलब्ध असलेले 16 टक्के आरक्षण वाढवून 20 टक्के करण्यात येणार आहे. तर, एसटी 1 टक्क्यांवरून 2 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. तर ईबीसी (अत्यंत मागास) आणि ओबीसी यांना मिळून ४३ टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, ‘स्त्री साक्षरतेत बरीच सुधारणा झाली आहे. 51 टक्क्यांवरून 73 टक्क्यांच्या वर गेला आहे. स्त्री शिक्षणाची स्थिती बरीच सुधारली आहे. मॅट्रिक पासची संख्या 24 लाखांवरून 55 लाखांवर गेली आहे. यापूर्वी इंटर पास महिलांची संख्या 12 लाख 55 हजार होती. आता तो आकडा 42 लाखांवर आहे. पदवीधर महिलांची संख्या 4 लाख 35 हजारांवरून 34 लाख झाली आहे, अशी आकडेवारी त्यांनी दिली.
महिला साक्षरतेच्या चर्चेदरम्यान ते म्हणाले की, आरक्षण वाढवण्यासाठी सल्ला घेण्यात येईल. या अधिवेशनातच बदल अंमलात आणायचे आहेत. बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित राहिल्या तर लोकसंख्या नियंत्रणात येईल. हे समजून सांगताना ते म्हणाले, ‘लग्न झाले तरच मुलगी शिकेल. मग, तो माणूस रोज रात्री करतो. त्यातच आणखी एक (मुलाचा) जन्म होतो. मुलगी शिकत असेल तर तिला ठेवू नका…, तिला बनवा…. म्हणूनच संख्या कमी होत आहे.
नितीशकुमार यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात विचित्र परिस्थिती पाहायला मिळाली. यावर महिला आमदार संतप्त झाल्या. तर इतर काही आमदार हसत होते. त्यांच्या या वक्तव्यावर काही आमदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते तारकिशोर प्रसाद म्हणाले की, मुख्यमंत्री हे अधिक चांगल्या पद्धतीने बोलू शकले असते. तर, भाजप आमदार निक्की हेमब्रम म्हणाल्या की मुख्यमंत्री हे सन्माननीयपणे बोलू शकले असते. पण, स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदर नव्हता हे दिसून आले अशी टीका केली.