बागेश्वर बाबांना शंकराचार्याचं चॅलेंज!! म्हणाले देशाचं लक्ष लागलेल्या ‘या’ भागात चमत्कार दाखवा
वेदांनुसार चमत्कार दाखवणाऱ्यांनाच मी मानतो, असा दावा अविमुक्तेश्वरानंद यांनी केला आहे.
नवी दिल्लीः बागेश्वर धाम (Bageshwar Dham) येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबा गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या चमत्कारांचा दावा करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकिकडे त्यांच्यावर कडाडून टीका होत आहे तर दुसरीकडे राजकीय नेत्यांचा पाठिंबाही त्यांना मिळतोय. आता तर शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनीच बागेश्वर बाबांना आव्हान दिलंय. छत्तीसगड येथील विलासपूरमध्ये त्यांनी यासंदर्भात वक्तव्य केलंय.
शंकराचार्य काय म्हणाले?
विलासपूर येथील एका कार्यक्रमात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी बागेश्वर बाबांचं नाव न घेताच, त्यांना चमत्कार दाखवण्याचं चॅलेंज दिलंय. ते म्हणाले, जोशीमठ येथे सध्या मोठ्या प्रमाणावर भूस्खलन सुरु आहे. देशाचं लक्ष लागलेल्या या जोशीमठमध्ये त्यांनी चमत्कार दाखवावा. हे भूस्खलन त्यांनी थांबवून दाखवावं.. तरच मी त्यांना मानेन…
वेदांनुसार चमत्कार दाखवणाऱ्यांनाच मी मानतो, असा दावा अविमुक्तेश्वरानंद यांनी केला आहे. मात्र फक्त आपली स्तुती आणि चमत्कारी बाबा म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्यांना मी मानत नाही, असं वक्तव्य शंकराचार्य यांनी केलंय.
पाकिस्तानवरून काय वक्तव्य?
काही दिवसांपूर्वी शंकराचार्य यांनी जबलपूरमध्ये एक वक्तव्य केलं होतं. ब्रिटिश भारत सोडून गेले तेव्हा मोहम्मद अली जिन्ना म्हणाले होते. मुस्लिमांना वेगळं करा. जेणेकरून आपल्या देशात जाऊन ते आनंदी राहतील. यातूनच भारताचे तुकडे झाले. पाकिस्तान तयार झाला होता. मात्र त्यावेळी काही मुस्लिम भारतात राहिले. त्यांना इथेच सुख शांती मिळत असेल तर पाकिस्तान बनवण्याची गरज काय? त्यामुळे या विषयावर पुनर्विचार व्हावा, अखंड भारताचा विचार करावा, असं वक्तव्य शंकराचार्य यांनी केलं होतं.
जोशीमठ कुठे आहे?
जोशीमठ हे उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. डेहराडून पासून 295 किलोमीटर अंतरावर असलेलं जोशीमठ हे बद्रिनाथचं प्रवेशद्वार आहे. हिमालय पर्वतरागांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होण्यास सुरुवात झाली आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण गावाचे स्थलांतर करण्यात आले आहे. आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी एक जोशीमठ अथर्ववेदासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं जातं. येथील भूस्खलन थांबवण्याचं चॅलेंज शंकराचार्य यांनी दिलंय…