नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी तब्बल 25 मिनटे चर्चा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी सरकारला दिलेला इशारा, त्याला भाजपकडून मिळत असलेलं समर्थन आणि राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पडत असलेल्या तपास यंत्रणांच्या धाडी या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मागच्या काळात पवारांच्या नातेवाईकांवरही ईडीच्या धाडी पडल्या होत्या. त्यामुळे या भेटीत पवारांनी मोदींकडे हे विषय काढले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या वृत्ताला कुणीही दुजोरा दिला नाही. तसेच राष्ट्रपतीपदाची निवडणूकही होऊ घातली आहे. शिवाय पवारांना यूपीएचे चेअरमनपद देण्याचीही जोरदार मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर तपास यंत्रणांनी धाडी मारल्या होत्या. ईडीचं हे धाडसत्रं सुरू असल्याने आघाडीतील अनेक नेते अस्वस्थ असून सूड भावनेने ही कारवाई केली जात असल्याचा त्यांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी मोदींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असल्याचा कयास आहे.
गुढी पाडव्याच्या दिवशी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेत राज यांनी मशिदीवरील भोंगे नाही उतरवल्यास हनुमान चालिसा सुरू करण्याचा इशारा दिला होता. राज यांनी हिंदुत्वाचं कार्ड हातात घेतलं आहे. त्याला भाजप नेत्यांकडून समर्थन मिळत आहे. शिवाय राज यांच्या या भूमिकेमुळे राज्यात धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच भाजप आणि मनसेची महापालिका निवडणुकीत युती किंवा अंडरस्टँडिंग होण्याची शक्यता आहे. पवारांच्या मोदी भेटीमागे ही सुद्धा कारणे असल्याचं सांगितलं जात आहे.
काही महिन्यांपूर्वी खुद्द शरद पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी धाडी मारण्यात आल्या होत्या. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही अशा पवारांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी तीन तीन दिवस बसून होते. एवढेच नव्हे तर पार्थ पवार यांच्या घरीही धाड मारण्यात आली होती. त्याची किनारही या भेटीला असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यात शरद पवार यांना यूपीएचं चेअरमनपद देण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा पवारांच्या यूपीएच्या चेअरमनपदाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पवार-मोदी भेटीत हा मुद्दाही चर्चिला गेला असावा असं सांगण्यात येतं.
येत्या जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. सध्या तरी शरद पवार हे राष्ट्रपती पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगानेही आजच्या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : प्रणिती शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली महागाईविरोधात आंदोलन