पाटणा : लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच देशातील प्रमुख विरोधी पक्ष कामाला लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बिहारच्या पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक होत आहे. एकूण 23 विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लागलं आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध नेते उपस्थित झाले आहेत. हे नेते पाटणा विमानतळावर आल्यावर स्वत: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विमानतळावर येऊन त्यांचं स्वागत केलं. देशभरातील प्रमुख नेते पाटण्यात आले असून भाजपविरोधातील रणनीती पाटण्यातूनच ठरणार आहे.
पाटणा विमानतळावर कार्यकर्त्यांची झुंबड उडाली आहे. विरोधी पक्षातील विविध पक्षांचे नेते आपआपल्या पक्षाचे झेंडे घेऊन विमानतळावर दाखल झाले आहेत. तसेच आपल्या नेत्यांचं गुच्छ देऊन स्वागत करत आहेत. नेते येताच जोरदार घोषणाबाजीही केली जात आहे. त्यामुळे पाटणा विमानतळ सध्या राजकारणाचं केंद्र झाल्याचं दिसत आहे. पाटणा विमानतळाबाहेर आणि परिसरात सर्वच राजकीय पक्षांची बॅनर्स लागले आहेत. आपल्या नेत्यांचं स्वागत करणारे बॅनर्स लागले आहेत. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते पाटण्यात आले असून आपल्या नेत्यांचं जंगी स्वागत करत आहेत.
आज संध्याकाळपर्यंत ही बैठक चालणार आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार आहे. तसेच मणिपूर येथील हिंसेसह देशातील इतर मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. भाजप विरोधी रणनीतीचा भाग म्हणून एकास एक उमेदवार देण्यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच ज्या राज्यात ज्या पक्षाची ताकद आहे, त्याला सर्वांनी बळ द्यावं, यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.