औरंगाबाद : परपुरुषासोबत घरोबा केला. त्याच्यासोबत वैवाहिक जीवन (Married Life) जगत असतानाच एका महिलेने पहिल्या पतीकडे पोटगी (Alimony) मागितली. त्यासाठी कोर्टाचा (Court) दरवाजा ठोठावला. नवऱ्याची ही छळवणूक सुरु झाली. पोटगीसाठी ती लढत असताना नवऱ्याने ती परपुरुषासोबत वैवाहिक आयुष्य जगत असल्याचा पुरावा न्यायालयात दिला आणि..
पत्नी परपुरुषासोबत विवाहितेसारखी जीवन जगत असल्याचा पुरावा नवऱ्याने दिला. प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी खालच्या न्यायालयाने दिलेला अंतरिम पोटगीचा आदेश रद्द केला. पुरावे पाहुन फेरनिर्णय घेण्याचा आदेश कोपरगाव न्यायालयाला दिला.
याचिककाकर्ता पती आणि प्रतिवादी पत्नी हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. त्यांचे लग्न 2002 मध्ये झाले होते. त्यांना दोन आपत्यही झाली. मात्र बेबनाव झाल्याने 2014 पासून हे दोघेही वेगळेवेगळे राहत होते. मुले याचिकाकर्त्या पतीकडे राहतात.
दरम्यान पत्नीने दुसऱ्या पुरुषासोबत संसार थाटला. ते दोघेही पती-पत्नीसारखे राहू लागले. त्यानंतर पत्नीने कोपरगाव न्यायालयात पहिल्या पतीकडून पोटगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. प्रकरणात कोपरगाव न्यायालयाने पहिल्या पतीला पाच हजार रुपये पोटगी देण्याचा अंतरिम आदेश दिला.
या आदेशाला पतीने अॅड. नितीन चौधरी यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. सुनावणीवेळी पतीने पत्नीचे परपुरुषासोबतचे वैवाहिक जीवन सुरु असल्याचे पुरावे दिले. तिच्या काही नातेवाईकांचे म्हणणे सादर केले. पत्नीला पोटगी मागता येत नसल्याचा दावा केला.
यासंदर्भातील कायद्याच्या कलम 125(4) नुसार पत्नी परपुरुषासोबत वैवाहिक जीवन जगत असेल तर तिला पोटगी मागण्याचा अधिकार नसतो, असा युक्तीवाद अॅड. चौधरी यांनी केला. यासंबंधीचे पुरावेही सादर केले. सुनावणीअंती खंडपीठाने कोपरगाव न्यायालयाने मंजूर केलेला पोटगीचा निर्णय रद्द केला. पुन्हा पुरावे तपासून निर्णय देण्याचा आदेश दिला.