नवी दिल्ली | धनुष्यबाण हातून निसटल्यानंतर मशाल चिन्हंही धोक्यात येतंय की काय, असं चित्र निर्माण झालंय. कारण समता पार्टीनंही मशाल चिन्हावर दावा करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय.उद्धव ठाकरे म्हणतात की शिंदेंनी धनुष्यबाण चोरलं आणि आता समता पार्टी म्हणतेय की, ठाकरे गटानं आमचं मशाल चिन्हं चोरलं.
मशाल चिन्हावर आधीच समता पार्टीनं दावा केला होता आणि आता समता पार्टीनं रितसर सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केलीय.
निवडणूक आयोगानं मशाल चिन्हं आम्हालाच दिलं होतं. पण नंतर मतांच्या टक्केवारीत मागे पडल्यानं चिन्हं गोठवलं. मात्र मशाल आम्हालाच द्यावं अशी मागणी समता पार्टीची आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंना मशाल तर शिंदेंना ढाल तलवार हे चिन्हं मिळालं होतं. मशाल चिन्हावर ठाकरे गटानं अंधेरीची पोटनिवडणूक जिंकलीही. पण आता समता पार्टीनं जुना दाखला देत, मशाल चिन्हावर दावा केलाय.
नुकतंच निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हं शिंदेंना दिलंय. त्यामुळं शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची ओळख पुन्हा शिवसेना अशी झाली आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेना तसंच धनुष्यबाणही गमावलं. पण आता समता पार्टीच्या याचिकेमुळं मशाल चिन्हंही धोक्यात येऊ शकते.