Sanjay Raut: एकच फ्रंट असेल तरच पर्याय देऊ शकतो, नेतृत्वाचं नंतर ठरेल; संजय राऊतांचे राहुल गांधींसोबत पाऊण तास खलबते

| Updated on: Dec 07, 2021 | 6:23 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली.

Sanjay Raut: एकच फ्रंट असेल तरच पर्याय देऊ शकतो, नेतृत्वाचं नंतर ठरेल; संजय राऊतांचे राहुल गांधींसोबत पाऊण तास खलबते
sanjay raut
Follow us on

नवी दिल्ली: देशात एकच फ्रंट असेल. तीन चार फ्रंट निर्माण केल्याने भाजपला पर्याय दिला जाऊ शकणार नाही, असं सांगतानाच काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट होऊच शकत नाही. या फ्रंटच्या नेतृत्वाचं नंतर ठरेल. पण फ्रंट एकच असेल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट अस्तित्वात येऊच शकत नसल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकत नाही. नवी आघाडी झाली तरी काँग्रेसच्या नेतृत्वातही एखादी आघाडी काम करेलच. काँग्रेससोबत अनेक पक्ष आहेत. ते काँग्रेसच्या नेतृत्वात जातील. त्यामुळे तीन तीन फ्रंट हवेत कशाला? काय करणार एवढे फ्रंट करून? अशाने भाजपला आपण पर्याय देऊ शकणार नाही, असं राऊत यांनी सांगितलं. विरोधकांची एक बैठक बोलावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कामी तुम्ही पुढाकार घ्यावा अशी विनंती मी राहुल गांधींना केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आम्ही सर्व एकत्रच आहोत

आजच्या बैठकीत केवळ उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीवरच नाही तर राष्ट्रीय राजकारणावरही चर्चा झाली. आघाडीचं नेतृत्व कुणी करावं याबाबत मी बोलत नाही. मला वाटतं एकच फ्रंट असावा. एकच फ्रंट बनेल. एकच फ्रंट बनायला हवा. एकच फ्रंट बनला तरच आपण पर्याय देू शकतो. आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

सबकुछ ठिक है

राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली. दीर्घ चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली. या भेटीतील संदेशच सांगायचा झाला तर सबकुछ ठिक है, हाच आमचा संदेश आहे, असं सांगतानाच राहुल गांधी यांच्याशी काय चर्चा झाली हे मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगेल. आदित्य ठाकरेंना सांगेन. नंतर तुमच्याशी बोलेल असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री-राहुल गांधींची भेट होणार?

या बैठकीत सर्व विरोधकांना एकत्र ठेवण्यावर चर्चा झाली. या विषयावर सर्वांनी चर्चा केली पाहिजे. विरोधकांचा एकच फ्रंट व्हायला हवा. काँग्रेसला वगळून कोणताही फ्रंट शक्य नाही. हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. त्यावर चर्चा झाली. राहुल गांधी लवकरच मुंबईत येणार आहेत. त्यांचा एक कार्यक्रम आहे. त्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाला सुरुवात केली असेल तर त्यांची आणि राहुल गांधींची भेट होईल, असंही त्यांनी सांगितलं.

शरद पवार पुरेसे आहेत

टीएमसी आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी शिवसेना मध्यस्थी करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी टीएमसी आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी शरद पवार पुरेसे आहेत. ते मजबूत नेते आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसेच उद्या प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून, 28 डिसेंबरला मुंबईत अंकिताचा विवाहसोहळा

St worker strike : कामावर हजर एसटी कर्मचाऱ्यांचे वाढीव पगार जमा, तर संपकऱ्यांना पगार नाही

पाच राज्यांच्या निवडणुका, महागाईसह आठ मुद्द्यांवर चर्चा, राष्ट्रवादीची बैठक सुरू; पोस्टरवरून अजितदादा गायब