पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत काही त्रुटी राहिल्या. ही गंभीर बाब आहे. जशी राज्य सरकारवर त्याची जबाबदारी येते तशीच ती केंद्रीय तपास यंत्रणांवरही येते, असं सांगतानाच याप्रकरणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फासावर लटकवायची भाषा भाजपवाले करत असतील तर 500 शेतकरी मरण पावले त्यासाठी कुणाला फासावर लटकवायचे?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत कोणतीही हयगय होता कामा नये. आपण या देशाचे पंतप्रधान गमावले आहेत. राजीव गांधींसारख्या नेत्याला गमावलं. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली होती. इंदिरा गांधींच्या सुरक्षेत चूक झाली होती. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांबाबत असं होत असेल तर गंभीर गोष्ट आहे. त्याबाबत सरकारनेच योजना तयार केली पाहिजे, असं राऊत म्हणाले.
पंजाब अशांत राज्य आहे. पंजाबचा शेतकरी, समाज हा बंडखोर आहे. बेडर आणि निर्भय आहे. शेतकरी आंदोलनानंतर वातावरण बदललं आहे. त्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना हवी होती. प्रत्येक गोष्ट राज्यांवर टाकून चालणार नाही. देशाचे पंतप्रधान आहेत ते. त्यांच्या सुरक्षेबाबत ते ज्या राज्यात जातात तिथलं वातावरण आणि परिस्थिती काय आहे ती केंद्रीय गृहमंत्रालयाला असायला हवी. तुमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील, गृहमंत्रालय असेल देशाचं… आयबी, रॉ या यंत्रणांना माहीत नाही पंजाबात काय घडणार आहे? लोक रस्त्यावर लोक उतरतील हे माहीत नसेल तर गुप्तचर खात्याचं अपयश आहे. पंजाब सरकारची चूक असेल तर त्याची चौकशी होईल. मोदी एका राजकीय कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांच्या पक्षाच्या. म्हणून तिथे आंदोलन झाले, असं सांगतानाच सरकार कुणाचेही असेल, अशा घटना होता कामा नये. देशाच्या अनेक पंतप्रधानाना यापूर्वी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे, नरेंद्र मोदी त्याला अपवाद नाहीत. यालाच लोकशाही म्हणतात. दीड वर्ष त्यांनीही शेतकऱ्यांची कोंडी केली होती, असं राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही फैलावर घेतलं. बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना दिलंय. महाराष्ट्र भाजप आज ज्या थाळीत खातेय तीही बाळासाहेबांनीच भरलीय. रिकाम्या थाळ्या वाजवल्यात ना? तुमचा त्याच थाळीपुरता संबंध आहे, असा खोचक टोला लगावतानाच ‘सामाना’त चंद्रकांत दादांवर अग्रलेख आल्यावर त्यांची छाती गर्वाने फुलते असे मला वाटते. त्यासाठी त्यांनी मला मैत्रीत चहा पाजला पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.
यावेळी त्यांनी गोवा काँग्रेसला आघाडीवरून कानपिचक्या दिल्या. गोवा काँग्रेसने भाजपसारखे वागू नये. आम्हीही महाराष्ट्राबाहेत वाढतोय. काँग्रेस गोव्यात स्वतःला मोठा पक्ष मानत असेल तर त्यांनी विशाल हृदयाने मित्र पक्षांना जागा सोडाव्यात. राष्ट्रवादी- शिवसेना आम्ही एकत्र आहोतच. काँग्रेसला अडचण आली तरी आम्ही शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढू. पण सर्व एकत्र आलो तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपले सरकार असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
शाळा, कॉलेज बंद करून मुले मॉल्समध्ये फिरणार असतील तर काय? लॉकडाऊनबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री टोपे?