धक्कादायक! अमेरिकेत जाण्यासाठी २ लाख भारतीयांनी स्वीकारला ‘डंकी रूट’
अमेरिकन सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांत दोन लाखांहून अधिक भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेले आहेत. त्यापैकी काहींना परत पाठवण्यात आले, तर काही जणांना ताब्यात घेण्यात आले.
नवी दिल्ली | 21 डिसेंबर 2023 : शाहरुख खानचा ‘डंकी’ सिनेमा आज प्रदर्शित झाला. ‘डंकी रूट’ स्वीकारणाऱ्यांवर हा सिनेमा आधारित आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती एका देशातून दुसऱ्या देशात बेकायदेशीरपणे प्रवास करते यावर आधारित हा चित्रपट आहे. ‘डंकी’ हा एक अवैध प्रवास आहे जो अनेक लोक त्यांच्या देशाबाहेर दुसऱ्या देशाची सीमा ओलांडण्यासाठी करतात. परंतु याच अवैध मार्गाचा प्रवास करून भारतातील सुमारे दोन लाख लोक अमेरिकेत गेले अशी धक्कादायक माहिती समोर आलीय.
बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करून परदेशात जाणाऱ्या भारतीयांची संख्या सातत्याने वाढत आहे. अमेरिकेत गेल्या पाच वर्षांत बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्यांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. अमेरिकन सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 दरम्यान 96 हजार 917 भारतीय कागदपत्रांशिवाय अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेले आहेत. त्यापैकी काहींना ताब्यात घेण्यात आले, तर काहींना परत पाठवण्यात आले.
कोविडनंतर सीमा पुन्हा उघडल्यानंतर वैध कागदपत्रांशिवाय अमेरिकेत येणाऱ्या भारतीयांची संख्या अनेक पटींनी वाढली. यामध्ये पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांतील तरुणांची संख्या अधिक आहे. हे तरुण ‘डंकी रूट’ मार्गाने अमेरिका, ब्रिटन किंवा कॅनडा गाठतात. मात्र, चांगल्या आयुष्याच्या शोधात ते आपला जीवही धोक्यात घालत आहेत.
अमेरिकेत कसे पोहोचतात?
‘डंकी रूट’ मार्गाने अमेरिकेत प्रवेश करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला कॅनडा बॉर्डर आणि दुसरी मेक्सिको सीमा. भारतातून अमेरिकेत पोहोचवण्याचे संपूर्ण काम बेकायदेशीर रित्या केले जाते. या मार्गाने अमेरिकेला पोहोचायला दिवस नाही तर अनेक आठवडे किंवा महिनेही लागतात. यासाठी तस्करही मोठी रक्कम घेतात. एक संपूर्ण नेटवर्क यासाठी काम करत असते.
भारतातून जाणारे तरुण थेट अमेरिकेत पोहोचत नाहीत. त्यांना अनेक देशाच्या सीमा पार कराव्या लागतात. त्यांना आधी मध्य पूर्व किंवा युरोपमधील देशात नेले जाते. मग इथून पुढचा थांबा आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिका. त्यानंतर दक्षिण मेक्सिको. पुढे दक्षिण मेक्सिको ते उत्तर मेक्सिको आणि शेवटी मेक्सिकोच्या बॉर्डरवरून अमेरिकेत पोहोचवले जाते.
अमेरिकन सभागृहात सिनेटर जेम्स लँकफोर्ड यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, दक्षिण सीमेवर सुमारे 45 हजार भारतीय पकडले गेले. त्यांनी तस्करांना पैसे दिले होते. त्या तरुणांना भारतात भीती वाटत होती म्हणून अमेरिकेत यायचे होते.
गेल्या 5 वर्षांत अमेरिकेत अवैधपणे प्रवेश केलेले भारतीय
2018-19 8,027
2019-20 1,227
2020-21 30,662
2021-22 63,927
2022-23 96,917 (ऑक्टोबर ते सप्टेंबर पर्यंतचा डेटा)