हेमंत सोरेन आणि केजरीवाल यांच्या अटकेत साम्य काय ? के.कविता बनणार माफीच्या साक्षीदार
ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहा समन्स बजावल्यानंतर काल अखेर अटक केली आहे. या आधी 31 जानेवारीला झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना देखील अटक झाली होती. या दोन नेत्यांच्या कारवाईत अनेक बाबी कॉमन आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री दोन तास चौकशी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) अखेर अटक केली. न्यायालयाने अटकेला रोखण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर गुरुवारी उशीरा ईडीचे अधिकारी त्यांच्या निवासस्थानी पोहचले. आधी त्यांची मेडीकल करण्यात आली. त्यानंतर त्यांनी लॉकअपमध्ये शिफ्ट केले. शुक्रवारी त्यांना राऊज एवेन्यू कोर्टात सादर करण्यात आले. परंतू मुख्यमंत्र्याला अटक झाल्याचे हे काही पहिले प्रकरण नाही. 31 जानेवारीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना देखील रांचीतून अशीच अटक झाली होती. त्यामुळे ईडीने दोन महिन्यातच दोन मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे. हेमंत सोरेन आणि केजरीवाल यांच्या अटक कारवाईत साम्य काय आहे ते पाहूयात…
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची अटक
ईडीने मद्य घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकूण नऊ समन्स बजावले होते. परंतू अरविंद केजरीवाल यांनी या समन्सला दाद न दिल्याने ईडीने कोर्टात त्यांची तक्रार देखील केली होती. ज्यानंतर अखेर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला रोख लावण्यास नकार दिला, त्यानंतर लागलीच ईडीने रात्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरील ईडीची कारवाई देखील या सारखीच आहे. कथित जमीन घोटाळ्यात सोरेन यांना देखील दहा समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी सोरेन यांची सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. म्हणजेच दोन्ही नेत्यांना ते मुख्यमंत्री पदावर असताना आणि त्यांना दहा समन्स बजावल्यानंतर अटक करण्यात आली आहे.
के. कविता बनणार माफीचा साक्षीदार
गेल्या काही वर्षांत ईडीने कारवाईचा फास आवळत नेला आहे. या विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच ईडी कारवाई करते असा आरोप होत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विधानसभा अध्यक्षांनी अटक झाल्यानंतरही केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत असे म्हटले आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. दोन महिन्यात ईडीने दोन मुख्यमत्र्यांना अटक केली आहे. यापूर्वी ईडीने माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के.कविता यांना देखील अटक केली आहे. आता के.कविता या अबकारी धोरणासंबंधीच्या प्रकरणात सरकारी साक्षीदार बनण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.