राजस्थान काँग्रेसमध्ये भूकंप; गेहलोत गटाच्या 92 आमदारांचे एकाचवेळी राजीनामे, पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध?
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वीच गेहलोत समर्थक आमदाराच्या गटाने बंडोखोरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसने ही बैठक देखील रद्द केली आहे. गेहलोत समर्थक 92 आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे.
जयपूर: राजस्थानच्या (Rajasthan) राजकारणात (politics) वेगवान घडामोडी घडताना दिसून येत आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण होणार यावरून सध्या वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सध्या सर्वात पुढे आहेत. त्यामुळे गेहलोत यांच्या राजीनाम्यानंतर सचिन पायलट हेच राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. मात्र गेहलोत समर्थक आमदारांच्या गटाने सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध केला आहे.
बैठक रद्द
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वीच गेहलोत समर्थक आमदाराच्या गटाने बंडोखोरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसने ही बैठक देखील रद्द केली आहे. गेहलोत समर्थक 92 आमदारांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्याकडे सोपावला आहे.गेहलोत हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत, मात्र त्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीपूर्वी गेहलोत समर्थक 92 आमदार गेहलोत गटाचे मंत्री शांती धारीवार यांच्या घरी एकत्र आले. तिथेच त्यांनी सामूहिक राजीनामा दिला. त्यानंतर हे राजीनामे विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांना सोपवण्यात आले.
गेहलोत समर्थक आमदारांचा आरोप काय?
नव्या मुख्यमंत्री निवड प्रक्रियेत आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. त्यामुळे एकाच वेळी 92 आमदारांनी आपला राजीनामा विधानसभाध्यक्षांकडे सोपावला आहे. आमदारांच्या या भूमिकेमुळे राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार अस्थिर बनले आहे.