security breach in lok sabha : सहा जणांनी मिळून कट रचला, गुरुग्राममध्ये राहिले, दोन जणांचा शोध सुरु
संसद भवन घटनेबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या चार जणांची अद्याप चौकशी सुरू आहे. चौघेही रात्री गुरुग्राममधील एका ठिकाणी एकत्र सोबत राहिले होते. ज्यांच्याकडे ते राहिले होते त्यांचीही पोलीस चौकशी होणार आहे.
नवी दिल्ली | 13 डिसेंबर 2023 : संसदेच्या सुरक्षा भंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हे चारही जण वेगवेगळ्या राज्यातील आहेत. लोकसभेतून अटक करण्यात आलेले आरोपी सागर शर्मा हा लखनऊचा तर मनोरंजन हा कर्नाटकातील बेंगळुरूचा रहिवासी आहे. तर, संसदेबाहेर अटक करण्यात आलेली महिला नीलम ही हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहेत. तर, २५ वर्षीय अनमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे. हे चौघेही एकमेकांना आधीच ओळखत असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. परंतु, या कटामागे आणखी दोन जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
संसदेची सुरक्षा भंग करून संसदेच्या आवारात तसेच लोकसभा सभागृहात धूर सोडणारे हे चारही जण पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते अशी महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्याचप्रमाणे चार दिवसांपूर्वी हे चारही जण दिल्लीत आले होते आणि दिल्लीतील एका गुरुग्राममधील एका घरात राहत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच या कटात आणखी दोन जण सहभागी आहेत असाही संशय पोलिसांना आहे.
संसद भवन घटनेबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या चार जणांची अद्याप चौकशी सुरू आहे. चौघेही रात्री गुरुग्राममधील एका ठिकाणी एकत्र सोबत राहिले होते. ज्यांच्याकडे ते राहिले होते त्यांचीही पोलीस चौकशी होणार आहे. महाराष्ट्रातील अमोल शिंदे हा पोलीस चौकशीत सकारात्मक उत्तर देत नाही. तसेच या चारही जणांची आज चौकशी करून उद्या सकाळी कोर्टात हजर केलं जाणार अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
लोकसभा सुरक्षा भंग संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षा व्यवस्थेचा भंग झाला. त्यामुळे पुन्हा एकदा संसद भवनाच्या सुरक्षेत मोठी त्रुटी दिसून आली. दोन जणांनी सुरक्षा कठडा तोडून लोकसभेतील व्हिजिटर गॅलरीतून उडी मारली. संसदेच्या कामकाजा सुरु होते. त्याचवेळी त्यांनी सभागृहात उड्या मारल्या. त्यामुळे येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. खासदारांनी त्या दोघांना घेराव घातला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत दोघांना पकडले. तर, लोकसभेच्या सुरक्षेत गुंतलेले मार्शल यांनीही तातडीने धाव घेत त्या दोघांवर नियंत्रण मिळवले.
अटक करण्यात आलेल्यांकडून कोणताही मोबाईल फोन जप्त करण्यात आलेला नाही. त्याचा मोबाईल फोन मिळाल्यास त्याद्वारे अधिक माहिती मिळेल या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. या चारही जणांचे अन्य दोन साथीदार ललित आणि विक्रम यांचाही शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी बसपा खासदार मलुक नगर म्हणाले की, अचानक एका तरुणाने त्यांच्या सीटच्या शेजारील प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली. यानंतर लगेचच आणखी एका तरुणाने उडी मारली. खासदारांनी एका तरुणाला घेराव घातला तेव्हा त्याने त्याच्या बुटातून काहीतरी काढले, त्यामुळे धूर निघू लागला. दोन्ही तरुण ‘हुकूमशाही चलेगी’ अशा घोषणा देत होते अशी माहिती त्यांनी दिली.