मेधा पाटकर यांना 5 महिन्यांचा तुरुंगवास, 10 लाखांचा दंड; 23 वर्षांपूर्वीच्या खटल्याप्रकरणी सुनावली शिक्षा

| Updated on: Jul 01, 2024 | 6:57 PM

व्ही के सक्सेना यांनी आपल्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मेधा पाटकर यांच्यावर मानहानीचे दोन खटले दाखल केले होते. याप्रकरणी 24 मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात मेधा पाटकर यांना दोषी ठरवण्यात आलं.

मेधा पाटकर यांना 5 महिन्यांचा तुरुंगवास, 10 लाखांचा दंड; 23 वर्षांपूर्वीच्या खटल्याप्रकरणी सुनावली शिक्षा
मेधा पाटकर
Follow us on

Medha Patkar Imprisonment : सामाजिक कार्यकर्ता आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या संस्थापक मेधा पाटकर यांना दिल्लीतील साकेत न्यायलयाीने पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबतच त्यांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. मेघा पाटकर यांना 23 वर्षीय जुन्या खटल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

नेमकं प्रकरण काय?

मेधा पाटकर आणि दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्यातील संघर्ष हा गेल्या 25 वर्षांपासून सुरु आहे. 2003 साली सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर नर्मदा बचाव आंदोलनात सक्रिय होत्या. तर त्यावेळी व्ही के सक्सेना नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजच्या माध्यमातून सक्रिय होते. त्यावेळी त्यांनी मेधा पाटकर यांच्या आंदोलनाला व्ही के सक्सेना यांनी कडाडून विरोध केला होता.

यामुळे मेधा पाटकर यांनी व्ही के सक्सेना यांच्याविरोधात आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या विरोधात जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल केला होता. तर दुसरीकडे व्ही के सक्सेना यांनी आपल्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मेधा पाटकर यांच्यावर मानहानीचे दोन खटले दाखल केले होते. याप्रकरणी 24 मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात मेधा पाटकर यांना दोषी ठरवण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

न्यायालयाने काय दिले आदेश?

दिल्लीतील साकेत न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, मेधा पाटकर यांनी तक्रारदाराच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो, याची जाणीव असूनही जाहीररित्या आरोप केले होते. तसेच मेधा पाटकर यांनी सक्सेना यांना देशभक्त नसलेला माणूस आणि पळपुटा म्हटलं होतं. तसेच हवाला गैरव्यवहारांमध्येही हात असल्याचा आरोप केला होता. मेधा पाटकरांनी केलेले हे आरोप तक्रारदाराचा अपमान करणारे आणि त्यांच्याबाबत जाणीवपूर्वक नकारात्मक मत तयार करण्यासाठी करण्यात आल्याचे दिसून येते.

मेधा पाटकर यांनी आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत दंडनीय गुन्हा केला आहे. त्यामुळे त्या दोषी आहेत. त्यांनी जाणूनबूजून तक्रारदाराची बदनामी केली. मेधा पाटकरांनी जे काही आरोप केले ते फक्त तक्रारदाराची बदनामी करण्यासाठीच होते. मेधा पाटकरांच्या कृतींमुळे लोकांच्या नजरेत सक्सेना यांची प्रतिष्ठा आणि त्यांच्या विश्वासार्हतेला खरोखरच मोठे नुकसान झाले आहे, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाने मेधा पाटकर यांना दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी त्यांना पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच अब्रुनुकसान म्हणून 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.