कुणाच्या अंगठ्याचे ठसे तर कुणाच्या सह्या, मृतकांनी काढली पोस्ट ऑफिसमधून 27 लाखांची पेन्शन
कोणतीही ओळख न पटवता, खातरजमा न करता मृत व्यक्तींच्या खात्यातून 27 लाखांची पेन्शन लांबविण्यात आली आहे. जणू काही ही रक्कम त्या मृत व्यक्तींनीच आपल्या खात्यातून काढली असे या प्रकरणात दाखविण्यात आलेय.
हरियाणा : मृत व्यक्तीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट खात्यात असलेल्या खात्यावरील रक्कम मृत व्यक्तीच्या वारसदाराला देण्यात येते. पण, ही रक्कम मिळविण्यासाठीही वारसदाराला अनेक हेलपाटे मारावे लागतात. शिवाय वारसदाराची योग्य ओळख पटल्याशिवाय ती रक्कम त्याला देता येत नाही. मृत व्यक्तीच्या नावे असलेले पैसे मिळविण्यासाठी वारसदाराला कोण खटाटोप करावा लागतो. पण, कोणतीही ओळख न पटवता, खातरजमा न करता मृत व्यक्तींच्या खात्यातून 27 लाखांची पेन्शन लांबविण्यात आली आहे. जणू काही ही रक्कम त्या मृत व्यक्तींनीच आपल्या खात्यातून काढली असे या प्रकरणात दाखविण्यात आलेय.
हरियाणा येथील सोनीपत येथे ही धक्कादायक घटना घडलीय. सोनीपतच्या बजाना खुर्द गावातील एका पोस्ट ऑफिसमध्ये दोन कर्मचाऱ्यांनी सामाजिक सुरक्षा पेन्शनचे सुमारे 27 लाख रुपये लांबविले. एका कर्मचाऱ्यावर सुमारे 25.33 लाख तर दुसऱ्या कर्मचाऱ्यावर 1.65 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सोनीपत विभागाच्या पोस्ट ऑफिस अधीक्षकांनी पोलिसांना सांगितले की, खरखोडा येथे प्रभाग 7 मध्ये राहणारा ऋषिराज हा नोव्हेंबर 2005 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत बजाना खुर्द गावात शाखा पोस्टमास्टर या पदावर काम करत होता. ऋषिराजने पोस्टमास्टर असताना सामाजिक सुरक्षा पेन्शन ( वृद्धापकाळ निवृत्ती वेतन ) योजनेत अपहार केला. त्याने मयत खातेदारांच्या खात्यातून वेगवेगळे अंगठ्याचे ठसे, खोटी स्वाक्षरी आणि खोटी साक्ष दाखवून 1 लाख 65 हजार 800 रुपयांचा अपहार केला.
टपाल खात्याने ऋषिराजच्या विरोधात पोलिसांकडे पाच तक्रारी दिल्या होत्या. मे 2022, जुलै 2022, सप्टेंबर 2022 आणि नोव्हेंबर 2022 मध्ये त्याच्याविरोधात तक्रारी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर 20 जानेवारीला तक्रारही देण्यात आली. याप्रकरणी तपास करून पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही रक्कम आणखी जास्त असू शकते, असे टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, गोहाना पोस्ट ऑफिसमध्येही अशीच रक्कम लांबविण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली. पोस्ट ऑफिस इन्स्पेक्टरने येथील पोस्ट मास्तर पदावर कार्यरत असलेल्या पवन कुमार यांच्याविरोधात तक्रार दिलीय. पवन कुमार याने 25 लाख 33 हजार 700 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय.
पोलिसांनी पोस्टमन ऋषिराज आणि पवन कुमार यांच्याविरुद्ध गन्नौर पोलिस ठाण्यात फसवणूक आणि गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. अद्यापपर्यंत टपाल विभागाने याप्रकरणी कोणतीही वसुली केलेली नाही. मृत पेन्शनधारकांच्या खात्यातून सुमारे 27 लाख रुपये फसवणूक करून काढण्यात आले. याप्रकरणी विभागाच्या तक्रारीच्या आधारे दोन टपाल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट अंगठ्याचे ठसे, सह्या आणि खोटी साक्ष देऊन मृतांच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच, या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.