काँग्रेसचे मिशन 2024… सोनियांचे बड्या नेत्यांसोबत विचारमंथन, प्रशांत किशोर यांचे सादरीकरण
नवी दिल्ली : देशात पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांच्या निकालानंतर काँग्रेस (Congress) मध्ये मोठे बदल करण्यात आले होते. त्यानंतर 2024 ला डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू केले होते. त्यात काँग्रेसमधील बड्या नेत्यांना बोलावले होते. दरम्यान निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या अफवा पसरल्या […]
नवी दिल्ली : देशात पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांच्या निकालानंतर काँग्रेस (Congress) मध्ये मोठे बदल करण्यात आले होते. त्यानंतर 2024 ला डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू केले होते. त्यात काँग्रेसमधील बड्या नेत्यांना बोलावले होते. दरम्यान निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र आज या अफवा नसून ते सत्य असल्याचेच काँग्रेसने आज स्पष्ट केले आहे. आहे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दिल्लीत एक मोठी बैठक बोलवली होती. त्या बैठकीला निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यापासून ते मल्लिकार्जून खरगे यांच्यापर्यंत बडे नेते उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीकडे संपर्ण देशाचे लक्ष लागलं होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यासोबतच अंबिका सोनी, दिग्विजय सिंग, अजय माकन या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक 10 जनपथ येथे दुपारी 3 वाजता संपली. ज्यात प्रशांत किशोर यांना येत्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याचे कळत आहे.
रणनितीकार प्रशांत किशोर
देशात पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांत काँग्रेसला म्हणावं तसं यश मिळालं नाही. तर पं. बंगाल येथे पार पडलेल्या निवडणूकांत ममता बॅनर्जी यांना जे यश मिळाले त्यात प्रशांत किशोर यांचा हात होता. त्यानंतर काँग्रेसनं 2024 डोळ्यासमोर ठेवत निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना बोलावलं होतं. त्यासाठी आज 10 जनपथ येथे बैठक पार पडली. त्यात प्रशांत किशोर यांना येत्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात येईल असं सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळत आहे. यावेळी सद्य राजकीय परिस्थितीसोबतच आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेस नेत्यांसमोर सविस्तर सादरीकरण केले आहे. यासोबतच 2024 च्या तयारीबाबतही रोडमॅप सांगितला. या दरम्यान सामूहिक चर्चा तसेच वैयक्तिक चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी 10 जनपथवर उपस्थित होते. तर याबाबत बोलताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, आज सोनिया गांधी यांनी तातडीची बैठक बोलावली. मी बंगलोरला होतो. याबाबत मला माहिती देण्यात आली. तसेच बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले होते.
प्रशांत यांची रणनीती काय?
काँग्रेस नेते अंबिका सोनी, दिग्विजय सिंग, मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपस्थित होते. यासोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणुगोपालही या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत प्रशांत किशोर यांच्याबाबत काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशांत किशोर यांचा निवडणूक तज्ज्ञ किंवा रणनीतीकार म्हणून पक्षात घेण्यास विरोध आहे. मात्र त्यांनी पक्षात आधी प्रवेश करावा आणि त्यानंतर कार्यकर्त्याप्रमाणे काम करावे, अशी काँग्रेसची इच्छा असल्याचे कळते.
370 उमेदवार उभे करावेत
10 जनपथवर पार पडलेल्या या बैठकीत प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सुमारे 370 जागांवर उमेदवार उभे करावेत, यावर भर दिला. त्यांच्या मते या अशा जागा आहेत जिथे पक्ष मजबूत आहे. उर्वरित जागांवर युतीच्या साथीदारांना उमेदवारी देण्याची संधी द्यावी. याशिवाय जेथे पक्ष आधीच मजबूत आहे त्या राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित करावे असा सल्लाही प्रशांत यांनी दिला आहे.
सोनियांचा वृत्तपत्रात लेख
दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात सरकारवर निशाणा साधला होता. त्यात त्यांनी आज आपल्या देशात द्वेष, कट्टरता आणि असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे म्हटले होते. तसेच आता हे थांबवले नाही तर हे नियंत्रणाबाहेर जाईल, असेही म्हटले होते.
काय झाले बैठकीत
पक्षाने काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. यामध्ये काँग्रेसच्या दिग्गजांनी 5 तास विचारमंथन केले. आमचा उद्देश काय आहे? आणि आम्ही लोकांपर्यंत काय पोहोचवणार आहोत? हे स्पष्ट व्हायला हवे, असे राहुल गांधी यांनी बैठकीत सांगितले होते. वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळी रणनीती बनवायची असल्याचेही राहुल गांधी यांनी बैठकीत सांगितले होते.