अर्धा तास हॉर्न वाजवूनही सिग्नल मिळेना अन् ट्रेन हलेना.. स्टेशन मास्तरची डुलकी महागात पडली !
इटावामध्ये स्टेशन मास्टरच्या निष्काळजीपणामुळे एक एक्सप्रेस अर्धा तास सिग्नलची वाट पाहत स्टेशनवर उभी होती. तर तिकडे ड्युटीवर असतानाच स्टेशन मास्तरांना गाढ झोप लागली होती. त्यांना उठवण्यासाठी ट्रेन ड्रायव्हर सतत हॉर्न वाजवत होता, पण त्यांची झोप काही उघडलीच नाही. या निष्काळजीप्रकरणामुळे स्टेशन मास्टरला नोटीस बजावण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधून एक अजब घटना समोर आली आहे. राज्यातील इटावामध्ये एक ट्रेन चक्क अर्धा तास स्टेशनवर सिग्नलची वाट बघ उभी होती. हॉर्न वाजवून मोटरमनही कंटाळला पण सिग्नल काही मिळेना आणि ट्रेन काही हलेना. काय झालं म्हणून सगळेच वैतागले, पण यामागचं कारण समोर आल्यावर सर्वांनीच डोक्याला हात मारला. ड्युटीवर असलेल्या स्टेशनमास्तरला झोप लागल्यानेच ट्रेन स्टेशनवर अडकून पडली होती. 3 मे रोजी झालेल्या या घटनेनंतर संबंधित स्टेशनमास्तरला नोटीस बजावण्यात आली आहे. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
एक डुलकी महागात पडली
इटावाजवळील उडी मोर रोड स्थानकावर, पाटणा-कोटा एक्स्प्रेस ट्रेन सुमारे अर्धा तास सिग्नलची वाट पाहत होती. हे रेल्वे स्थानक आग्रा विभागात येते. मात्र अर्ध्या तासानंतरही ट्रेन काही हलेना, कारण स्टेशन मास्तरला गाढ झोप लागली होती. या घटनेची गंभीर दखल घेत स्टेशन मास्तरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. स्टेशन मास्तरच्या या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती.
आग्रा रेल्वे विभागाचे पीआरओ प्रशस्ती श्रीवास्तव यांच्या सांगण्यानुसार, संबंधित स्टेशन मास्टरला कारणे दाखवा नोटीस जारी केली असून शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. उडी मोड रोड स्टेशन हे इटावापूर्वीचे एक छोटे परंतु महत्त्वाचे स्थानक आहे कारण आग्रा तसेच झाशीहून प्रयागराजकडे जाणाऱ्या गाड्या या स्थानकावरून जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेशन मास्टरला उठवण्यासाठी आणि ट्रेन हलवण्यासाठी ट्रेनच्या लोको पायलटने अनेक वेळा हॉर्न वाजवावा लागला. संबंधित स्टेशन मास्टरने आपली चूक मान्य केली असून त्याबद्दल माफीही मागितली आहे. ड्युटीवर असलेले कर्मचारी ट्रॅक तपासणीसाठी गेले होते म्हणून आपण स्टेशनवर एकटेच होतो, असे त्याने बचावात सांगितले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) तेज प्रकाश अग्रवाल यांनी ही घटना गांभीर्याने घेतली आहे. सध्या त्यांचे लक्ष गाड्यांच्या वेळेत सुधारणा करण्यावर आहे. कर्मचाऱ्यांनी वक्तशीरपणाचे पालन करावे यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळेच त्या विभागातील गाड्या ९० टक्के वेळेवर धावत आहेत. मात्र एका स्टेशन मास्टरच्या निष्काळजीपणामुळे इतरांची मेहनत वाया गेलीच पण ट्रेन संचलनासाठीही गंभीर धोका निर्माण झाला.