अहमदाबाद : आज अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामचंद्रांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. सगळ्या देशाच लक्ष या क्षणाकडे याकडे लागल आहे. 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र आपल्या गर्भगृहात विराजमान होतील. अयोध्येत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा होईल. अयोध्येतील या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. कालपासून म्हणूजे रविवारपासूनच देशभरात कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. रविवारी देशातील काही भागात प्रभू रामचंद्रांच्या शोभायात्रेच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गुजरात मेहसाणा जिल्ह्यात एक अप्रिय घटना घडली.
प्रभू रामचंद्रांच्या या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. यावेळी गुजरात पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. प्राण प्रतिष्ठेआधी मेहसाणा जिल्ह्यातील खेरुला शहरात ही घटना घडली. इंडिया टुडेने पीटीआयच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या तीन नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलीस अधीक्षक विरेंद्रसिंह यादव यांनी ही माहिती दिली.
आता तिथे परिस्थिती कशी आहे?
“पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन दरम्यान 15 जणांना ताब्यात घेतलं. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी शोभा यात्रेसोबत असलेल्या पोलिसांनी लगेच पावल उचचली व परिस्थिती नियंत्रणात आणली” असं विरेंद्रसिंह यादव यांनी सांगितलं. दगडफेकीच्या या घटनेत कोणीही गंभीररित्या जखमी झालेल नाहीय. घटनास्थळी आता परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढवली आहे.