Breaking | सुप्रीम कोर्टात नव्या पाहुण्याची एंट्री, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कुणाची ओळख करून दिली?
Supreme court | सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील महत्त्वाची सुनावणी सुरु असतानाच एका नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यात आलं.
नवी दिल्ली | महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) सत्तासंघर्षात एकापेक्षा एक तगडे युक्तिवाद मांडले जात आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अशा या खटल्याची सुनवाणी आता अंतिम टप्प्यात आहे. याच वेळी आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची घटना घडली. सकाळच्या वेळी शिंदे गटाचे वकील हरीश साळले, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. दुपारी लंचब्रेक झाला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद सुरु केला, एवढ्यात सुप्रीम कोर्टात नव्या पाहुण्याची एंट्री झाली. विशेष म्हणजे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कोर्टातील मान्यवरांना स्वतः त्यांची ओळख करून दिली.
कोण आहेत पाहुणे?
सुप्रीम कोर्टात आज सत्ता संघर्षाची सुनावणी सुरु असताना केनियाच्या सर न्यायाधीशांनी सदिच्छा भेट दिली. मार्था करंबू कोमे या केनियाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश आहेत. ६१ वर्षीय कोमे या शांत आणि महिला हक्कांच्या कट्टर पुरस्कर्त्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून केनियाचं शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली होती. आज मार्था कोमे आणि त्यांचं शिष्टमंडळ सुप्रीम कोर्टात हजर झाले. केनियाचे काही वकीलदेखील कोर्टरुममध्ये हजर झाले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मार्था कुमे यांची ओळख सर्वांना करून दिली. सरन्यायाधीश होण्यापूर्वी त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या कामगिरीवर चंद्रचूड यांनी भाष्य केलं. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटलाही मी त्यांना सांगितला असल्याची मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. ही ओळख करून दिल्यानंतर कोर्टरुममधील वकिलांनीही मार्था कुमे यांना नमस्कार केला. त्यानंतर कोर्टातील पुढील सुनावणीला सुरुवात झाली.
महेश जेठमलानींचा युक्तिवाद काय?
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी दुपारच्या सत्रात लंच नंतर पुन्हा युक्तिवादाला सुरुवात केली. आमदार अपात्रतेचा मुद्दा यांनी लावून धरला. शिंदे गटातील आमदार अपात्र करताना किमान १४ दिवसांची वेळ द्यायला हवी होती. कायद्यात स्पष्टपणे असा उल्लेख आहे. मात्र आमदारांना देण्यात आलेली अल्पमुदतीची मुदत ही कायद्याला धरून नव्हती, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला. ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभूंनी नोटीस काढली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे प्रतोद भरत गोगावले यांनीही नोटीस काढली. त्यामुळे प्रभू यांच्या नोटिशीला काही अर्थ रहात नाही, असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केला.