अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण कारवाई योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारचा अहवाल ग्राह्य धरला आणि कारवाई योग्य असल्याचं स्पष्ट केलं. तसेच अफझल खान मेमोरियलचा अर्जही फेटाळून लावला.
नवी दिल्ली: साताऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळी अतिक्रमण हटवण्यास विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कबरीजवळील अतिक्रमण हटवण्याची कारवाई योग्यच असल्याचा दावा कोर्टाने केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवलं होतं. सरकारने दोन धर्मशाळा आणि 19 खोल्या होत्या. या तोडक कारवाईच्या विरोधात हजरत मोहम्मद अफझल खान मेमोरियल ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही कारवाई आयोग्य असल्याचा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला होता.
तसेच कबरीजवळचे जे बांधकाम पाडण्यात आले. ते पुन्हा बांधले जावे. राज्य सरकारने चुकीची कारवाई केल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील निजाम पाशा यांनी केला होता. त्यावर त्यासाठी तुम्हाला नव्याने अर्ज दाखल करावा लागेल किंवा उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल, असं कोर्टाने सांगितलं.
मात्र, राज्य सरकारच्या वकिलानेही जोरदार युक्तिवाद करत कारवाई कोर्टाच्या आदेशानुसारच झालेली असल्याचं सांगितलं. तसेच जी अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली त्याचे फोटो कोर्टाला दाखवले. तसेच मूळ कबर व्यवस्थित असून तिला धक्का लावला नसल्याचंही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. या कारवाईबाबतचा सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवालही कोर्टात सादर करण्यात आला.
सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारचा अहवाल ग्राह्य धरला आणि कारवाई योग्य असल्याचं स्पष्ट केलं. तसेच अफझल खान मेमोरियलचा अर्जही फेटाळून लावला. याचिकाकर्त्यांनी दुसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, येत्या 30 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतापगडाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीच्या वाद सुरू असताना मुख्यमंत्र्यांकडून या ठिकाणी मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हजर राहणार आहेत.
30 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजल्यापासूनच या ठिकाणी छत्रपतींच्या साहसी कामगिरीचे पोवाडे गायले जाणार आहेत. तसेच या ठिकाणी शासकीय कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी अफझल खानाच्या वधाचा देखावा उभा करण्याची मागणी होती, त्यावर निर्णय होणार आहे.