सर्वात मोठी बातमी: सत्तासंघर्षावरील निकाल कधी? सध्या कुणाचे पारडे जड?; वकिलाने थेट महिनाच सांगितला
हे प्रकरण सात न्यायाधीशांकडे जाणार नाही. पाच न्यायाधीशच या प्रकरणावर सुनावणी करणार आहेत. पाच न्यायाधीशच नबाम रेबिया प्रकरणाचा मुद्दा मेरीटवर ऐकणार आहेत. सध्या तरी शिंदे गटाचं पारडं जड आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही. या प्रकरणातील काही मुद्द्यांवर सुनावणी होणे बाकी आहे. त्यामुळे येत्या मंगळवारपासून या प्रकरणावरील काही मुद्द्यांवर पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे. सध्या तरी हे प्रकरण लार्जर बेंचकडे जाणार नाही. मात्र, त्यावरचा निर्णयही मंगळवारीच येऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लांबणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या प्रकरणातील वकिलाने या संपूर्ण प्रकरणाचा निकाल कधी लागणार यावर भाष्य केलं आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागू शकतो, असं या वकिलाने म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी महत्त्वाची माहितीही दिली आहे.
वकील सिद्धार्थ शिंदे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातील पाच न्यायाधीशांपैकी येत्या 15 मे रोजी जस्टिस शहा हे निवृत्त होत आहेत. तर जस्टिस मुरारी हे जुलै महिन्यात निवृत्त होत आहेत. मध्ये उन्हाळ्याची सुट्टी आहे. त्यामुळे एप्रिल ते मे महिन्यात या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित आहे, असं सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं.
नबाम रेबियाची मेरिटवर दखल
सर्वोच्च न्यायालयाने नबाम रेबिया प्रकरण बंद केलेलं नाही. या प्रकरणाची कोर्ट दखल घेणार आहे. पण मेरीटवरच या प्रकरणाची दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे नबाम रेबिया प्रकरणाची दखल घेतली जाणारच नाही हे म्हणणे योग्य नाही, असंही शिंदे स्पष्ट केलं.
या मुद्द्यांवर होणार सुनावणी
मंगळवारपासून सर्वोच्च न्यायालयात कोणत्या मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे, त्यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयात 10वी अनुसूची, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकते की नाही? यावर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, असं ते म्हणाले.
शिंदे गटाचं पारडं जड
हे प्रकरण सात न्यायाधीशांकडे जाणार नाही. पाच न्यायाधीशच या प्रकरणावर सुनावणी करणार आहेत. पाच न्यायाधीशच नबाम रेबिया प्रकरणाचा मुद्दा मेरीटवर ऐकणार आहेत. सध्या तरी शिंदे गटाचं पारडं जड आहे. मात्र, आज शिंदे गटाला सेटबॅक बसल्याचं या वकिलाचं म्हणणं आहे.