आज या वर्षातील पहिले सूर्यग्रहण दिसले आहे. पण हे सूर्यग्रहण भारत देश सोडून जगातील अनेक देशांमध्ये दिसले आहे. जगभरातून या सूर्यग्रहणाचे अनेक सुंदर आणि आकर्षक फोटो समोर आले आहेत. तसंच सुमारे पाच तासांच्या या ग्रहणात सूर्याचे वेगवेगळ्या रूपात दर्शन झाले आहे.
सूर्यग्रहणाचे वर्णन हे हाइब्रिड सूर्यग्रहण असे करण्यात आले आहे. कारण यावेळीच्या ग्रहणात सूर्याची तीन वेगवेगळी रूपे दिसली आहेत. काही देशांमध्ये, सूर्य जवळजवळ पूर्णपणे झाकलेला दिसत होता तर काही ठिकाणी तो अर्धवट दिसत होता.
हे पहिले सूर्यग्रहण आज (20 एप्रिल) सकाळी 7.30 वाजता सुरू झाले. हे ग्रहण पाच तासांपेक्षाही जास्त काळ चालणार असून ते दुपारी 12:29 वाजता संपेल.
सूर्यग्रहण म्हणजे काय? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला असेल. तर जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात. हे ग्रहण आंशिक, पूर्ण आणि कंकणाकृतीही असू शकते. आजच्या सूर्यग्रहणाबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, शतकानुशतके अशी खगोलीय घटना अगदि क्वचितच पाहायला मिळते.
विशेष म्हणजे लोक या सूर्यग्रहणाचा मनसोक्त आनंद घेताना दिसले. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोक खास चष्म्याचा वापर करताना दिसले. तर काही ठिकाणी लोकांनी दुर्बिणीतूनही सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.