Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांची पाच कामं, देश कधीही विसरणार नाही!
आंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यासू भाषणांनी भारताची मान अभिमानाने उंचवणाऱ्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी रात्री निधन झालं.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यासू भाषणांनी भारताची मान अभिमानाने उंचवणाऱ्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी (Sushma Swaraj) वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली.
सुषमा स्वराज यांची पाच कामं देश कधीही विसरणार नाही
पासपोर्ट क्रांती – पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया कशी होती याचा अनुभव ज्यांनी 2014 च्या अगोदर पासपोर्ट काढला त्यांना असेल. पण सुषमा स्वराज यांनी यात अनेक क्रांतिकारी बदल घडवून आणले. कागदपत्रामुळे होणारी पिळवणूक आणि पोलीस स्टेशनमध्ये होणारी अडवणूक टाळण्यासाठी त्यांनी प्रक्रिया सुलभ केली. आधार कार्डलाही जन्माचा दाखला म्हणून मान्यता दिली. पासपोर्ट काढण्यासाठी वाटणारी जटील प्रक्रीया सुषमा स्वराज यांनी सुलभ केली.
पाकिस्तानला एकटं पाडलं
जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्यात सुषमा स्वराज यांचा सर्वात मोठा वाटा आहे. चीनने दहशतवादी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास UNSC मध्ये विरोध केला. पण यानंतर सुषमा स्वराज यांचा चीन दौरा झाला आणि त्या यश घेऊन आल्या. यानंतर भारताच्या बाजूने निर्णय झाला
कुलभूषण जाधव प्रकरण
पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सुषमा स्वराज यांनी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात भक्कमपणे बाजू फक्त सुषमा स्वराज यांच्यामुळे मांडली. कारण योग्य वकिलाची निवड करण्यापासून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे यापर्यंत त्यांनी स्वतः लक्ष दिलं. या सगळ्यात कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाकडेही त्यांनी लक्ष दिलं
भारतीय मुलींसाठी वरदान ठरणारा कायदा
अनेक अनिवासी भारतीयांकडून (NRI) भारतात मुलींशी लग्न केलं जातं, पण त्या मुलीला भारतातच ठेवून मुलगा परदेशात पोबारा करतो, किंवा मुलीचा परदेशात छळ केला जातो. याबाबतच्या अनेक तक्रारी होत्या. यासाठी सुषमा स्वराज यांनी कायदा आणत त्यात कठोर तरतुदी केल्या.
अखाती देशांशी संबंध
इराणमध्ये चाबाहार पोर्टचा विकास करण्यात सुषमा स्वराज यांनी मोलाचं योगदान दिलं. भारतासाठी मध्य आशिया आणि अफगाणिस्तानमध्ये व्यापाराला पाकिस्तानवरील अवलंबत्व कमी करणारा हा मार्ग तयार करण्याचं व्हिजन ठेवत त्यांनी इराणशी संबंध कायम ठेवले. येत्या काही वर्षात भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा निर्णय ठरेल. कारण मध्य आशिया आणि अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी आता भारताला पाकिस्तानची गरज राहिलेली नाही.