Tabassum Death: सिनेसृष्टीतील आणखी एक तारा हरपला, प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन
तबस्सुमने 1947 मध्ये बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनवर 'फुल खिले हैं गुलशन-गुलशन' हा सेलिब्रिटी टॉक शो होस्ट केला
मुंबई, सदाबहार अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन (Tabassum Death) झाले आहे. बाल अभिनेत्री आणि सेलिब्रिटी टॉक शो होस्ट म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा होशन गोविल यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबासह त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तबस्सुमला काल म्हणजेच शुक्रवारी रात्री दोन हृदयविकाराचे झटके आले. त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका सकाळी 8:40 वाजता आणि दुसरा 8:42 वाजता आला, ज्यामुळे त्यांचे निधन झाले. आज मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलगा होशन यांनी दिली निधनाची माहिती
होशन गोविल म्हणाले, ‘काल रात्री 8.40 वाजता आईचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिला वाचविण्यात यश आले नाही. आम्ही आमच्या शोसाठी आधीचे 10 दिवस शूट केले आहे त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा शूटिंग करणार होतो. दरम्यान ही घटना घडली. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
1947 मध्ये तबस्सुम यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली
विशेष म्हणजे तबस्सुमने 1947 मध्ये बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनवर ‘फुल खिले हैं गुलशन-गुलशन’ हा सेलिब्रिटी टॉक शो होस्ट केला. तिने 1972 ते 1993 या काळात हा शो होस्ट केला होता. तबस्सुमने नर्गिसच्या विरुद्ध बालकलाकार म्हणून चित्रपटात पदार्पण केले. यानंतर ती मेरा सुहाग, मजहदार आणि बडी बहन यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. त्यांचा शेवटचा चित्रपट 1990 मध्ये आलेल्या स्वर्ग या चित्रपटात होता.