दिल्लीतील ‘तब्लिग-ए-जमात’ कोरोनाचे प्रसारकेंद्र ठरण्याची भीती, 24 जणांना लागण, नऊ मृत्यू, 200 कोरोना संशयित
निझामुद्दीन परिसरात 'तब्लिग-ए-जमात' कार्यक्रमात तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगाल सारख्या अनेक राज्यामधील भाविक सहभागी होऊन परतल्याने समूह संसर्गाची भीती आहे (Tablighi Jamaat Nizamuddin event Corona Spread)
नवी दिल्ली : निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 350 भाविकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत यापैकी 24 जणांची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तब्लिग-ए-जमातमध्ये सहभागी झालेल्या तब्बल 700 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. (Tablighi Jamaat Nizamuddin event Corona Spread)
दिल्लीत हजरत निझमुद्दीनमध्ये प्रसिद्ध दर्गा असून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात. जमातच्या मुख्यालयात 1 ते 15 मार्च दरम्यान ‘तब्लिग-ए-जमात’ हा कार्यक्रम झाला होता. नमाज अदा करत असताना कोरोनाबाधित व्यक्तीमुळे 200 पेक्षा अधिक व्यक्तींना संसर्ग झाल्याची शंका आहे. भाविक सहभागी होऊन मूळगावी परतल्याने समूह संसर्गाची भीती आहे.
निमाझमुद्दीनमधील सर्व रहिवाशांना दिल्ली पोलीस बसने जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये तपासणीसाठी घेऊन जात आहेत. यातून संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
याआधीच, कार्यक्रमात सहभागी झालेल्या 9 जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला आहे. तेलंगणामधील सहा जणांचा, तर कर्नाटक, जम्मू-काश्मिर, तामिळनाडूतील प्रत्येकी एकाचा मृत्यू ‘कोरोना’मुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. जम्मू काश्मीरमधील 65 वर्षीय नागरिकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यानंतर याची पाळंमुळं समोर येऊ लागली. तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगालमधील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध उघड होऊ लागले. (Tablighi Jamaat Nizamuddin event Corona Spread)
जम्मू-काश्मिर, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, तेलंगणासह विविध राज्यातील व्यक्तीही सहभागी झाल्याची माहिती आहे. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स देशाचे नागरिकही यात सहभागी झाले होते. एकूण एक हजारापेक्षा जास्त भाविक सहभागी झाले होते.
तामिळनाडू सरकारने राज्यातील सुमारे 1500 रहिवासी या कार्यक्रमासाठी दिल्लीच्या निजामुद्दीनला गेल्याचं सांगितलं. त्यापैकी 981 जणांना अधिकाऱ्यानी शोधून काढले आहे आणि त्यांची चाचणी घेण्यात येत आहे. तर तेलंगणातून गेलेल्या सर्व 194 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
निजामुद्दीनला ‘तब्लिग-ए-जमात’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या काश्मीर खोऱ्यातील व्यक्तींची यादी जम्मू काश्मीर सरकारने तयार केली आहे. या यादीमध्ये शेकडो काश्मिरींचा समावेश आहे. तसेच उत्तर प्रदेश प्रशासनानेही या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यातील लोकांना शोधण्याचे आदेश जारी केले आहेत.
Home Ministry has found violation of visa rules by foreigners who attended Tablighi Jamaat event in Nizamuddin, Delhi: Government sources pic.twitter.com/CAb29qewt4
— ANI (@ANI) March 31, 2020