रामलल्लासाठी 7 दिवस 7 वेगवेगळे पोशाख, अयोध्येतील श्रीरामांचं अंगवस्त्र बनवण्याचा मान कुणाला?

| Updated on: Jan 01, 2024 | 4:20 PM

अयोध्येतील श्रीरामांचं अंगवस्त्र बनवण्याचा मान कुणाला असणार? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. अयोध्येतील टेलर भागवत प्रसाद पहाडी यांना हे मोठं भाग्य मिळालं आहे. विशेष म्हणजे भागवत प्रसाद पहाडी यांचं अवघ्या 10 बाय 13 फुटाचं म्हणजेच 130 चौरस फुटांचं अयोध्येत टेलरचं दुकान आहे. त्यांना श्रीरामांच्या मूर्तीसाठी पोशाख बनवण्याचं भाग्य मिळालं आहे.

रामलल्लासाठी 7 दिवस 7 वेगवेगळे पोशाख, अयोध्येतील श्रीरामांचं अंगवस्त्र बनवण्याचा मान कुणाला?
Follow us on

प्रदीप कापसे, Tv9 मराठी, अयोध्या | 1 जानेवारी 2024 : अयोध्येतील श्रीरामांच्या भव्य मंदिराचं 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत जोरदार तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे अयोध्येत रामलल्लाचं अंगवस्त्र बनवले जात आहेत. रामलल्लाचं अंगवस्त्र बनवण्याचा मान कुणाला मिळणार? याबाबतही अनेकांना उत्सुकता होती. अखेर याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अयोध्येतील टेलर भागवत प्रसाद पहाडी हे रामलल्लाचा पोशाख बनवणार आहेत. रामलल्लासाठी 7 रंगाचे पोशाख बनवले जाणार आहेत. नवीन मूर्तीसाठी अजून पोशाख शिवलेला नाहीय. मात्र मंदिर ट्रस्टकडून निर्णय कळवल्यावर पोशाख तयार होणार आहे. हा पोशाख देखील भागवत प्रसाद टेलरच बनवणार आहेत. त्यांच्या घरी परंपरागत देवाचे अंगवस्त्र बनवण्याचा व्यवसाय आहे. रामलल्लाचे पोशाख बनवण्याची सेवा भागवत प्रसाद यांच्याकडे आहे.

आम्ही टेलर भागवत प्रसाद पहाडी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “अयोध्येतील राम मंदिराच्या रामलल्लाच्या मूर्तीसाठी पोशाख शिवण्याचं काम आम्हाला मिळणं हे आमच्यासाठी खूप भाग्याचं आणि आनंदाचं आहे. हे काम माझे वडील बाबूलालजी करत होते. त्यांचं नाव बाबूलाल टेलर असं आहे. त्यांच्याच नावाने दुकान होतं. आम्ही दोन भाऊ आहोत. भागवत प्रसाद पहाडी आणि शंकरलाल असे आम्ही दोन भाऊ आहेत. तसेच आम्हाला पवनकुमार, श्रावणकुमार आणि संजयकुमार हे आमचे तीन मुलं आहेत”, अशी प्रतिक्रिया टेलर भागवत प्रसाद पहाडी यांनी दिलं.

रामलल्लासाठी 7 दिवस 7 वेगवेगळे पोशाख

“रामलल्लाला शनिवारसाठी निळ्या रंगाचा पोशाख शिवला जातोय. तर रविवारसाठी गुलाबी पोशाख आहे. सोमवारसाठी पांढरा रंग, मंगळवारी लाल, बुधवारी हिरवा, गुरुवारी पिवळा, तर शुक्रवारसाठी क्रीम कलरचा पोशाख असणार आहे. आमचे रामलल्ला 7 दिवस 7 वेगवेगळे पोशाख परीधान करतात. तसेच अयोध्यातील इतर मंदिरांमध्ये सात दिवस सात रंगाचे कपडे बदलले जातात”, असं टेलर भागवत प्रसाद पहाडी यांनी सांगितलं.

“रामलल्लासाठी कपडे शिवताना आम्हाला खूप आनंद मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नसते तर मंदिर तयार झालं नसतं”, असं मत यावेळी टेलर भागवत प्रसाद पहाडी यांनी व्यक्त केलं.