टाटा समूह 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट करणार, देशभर 400 ऑक्सिजन प्लांट उभारणार

| Updated on: May 04, 2021 | 10:57 PM

देशात ऑक्सिजनचा तुटवडा (shortage of Oxygen) निर्माण झाल्याने अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे.

टाटा समूह 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट करणार, देशभर 400 ऑक्सिजन प्लांट उभारणार
Tata Group
Follow us on

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. अशातच देशात ऑक्सिजनचा तुटवडा (shortage of Oxygen) निर्माण झाल्याने अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. अशातच आता टाटा समूह (Tata Group) विमानाद्वारे परदेशातून 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स भारतात आणणार आहे आणि सुमारे 400 ऑक्सिजन उत्पादन युनिट्सची स्थापना करणार आहे. या ऑक्सिजनचा वापर लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये केला जाऊ शकतो. टाटा सन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने असेही सांगितले की, ग्रुपच्या विविध कंपन्यांनी एकत्रित येत कोव्हिड रुग्णांसाठी सुमारे 5,000 बेड्सची व्यवस्था केली आहे. (Tata group to airlift 60 cryogenic tankers from overseas, build 400 oxygen plants)

टाटा समूह त्यांच्या कर्मचार्‍यांना, विशेषत: भारतीय हॉटेल्सशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे, जेणेकरुन रुग्णांची काळजी घेण्यासाठी कर्मचार्‍यांची कमतरता भासू नये. टाटा ग्रुपने आपल्या बऱ्याच हॉटेल्सचं कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये रूपांतर केलं आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष (पायाभूत सुविधा, संरक्षण, एरोस्पेस आणि ग्लोबल कंपनी अफेअर्स विभाग) बनमाली अग्रवाल म्हणाले की, आम्ही दररोज सुमारे 900 टन ऑक्सिजन उपलब्ध करत आहोत. टाटा स्टील स्वतः हे काम करत आहे. टाटा स्टीलमधील आमच्या लोकांनी वाहतूक ही समस्या असल्याचे ओळखले आहे. तसेच आम्हाला विशेष क्रायोजेनिक कंटेनरची आवश्यकता आहे. क्रायोजेनिक कंटेनर्स भारतात नाहीत. त्यामुळे आम्हाला हे इतर देशांकडून माहिती घेऊन, शोधून विमानाद्वारे हे कंटेनर्स देशात आणावे लागणार आहेत.

अग्रवाल म्हणाले की, “आम्ही जवळपास 60 कंटेनर्स भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यापैकी सुमारे 14 कंटेनर्स यापूर्वीच भारतात दाखल झाले आहेत. अजून बरेच कंटेनर्स येणं बाकी आहे. यासाठी आम्ही लिंडेसारख्या आमच्या भागीदारांसोबत काम करत आहोत, ज्यांच्याशी आमचा चांगला संबंध आहे. कंटेनर्स आणण्यासाठी हवाई दलाची विमानं उपलब्ध करून दिल्याबद्दल अग्रवाल यांनी सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले की कोविड -19 साथीच्या रोगाची दुसरी लाट अत्यंत गंभीर असून ती अचानक आल्यामुळे चिंता वाढल्या आहेत.

ऑक्सिजन कंटेनर वर GPS बसवणं अनिवार्य

ऑक्सिजनची कमतरता आणि पुरवठ्यात होणारा उशीर पाहता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एक मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने ऑक्सिजन कंटेनर (Oxygen Container), टँकर आणि वाहनांमध्ये व्हीकल लोकेशन ट्रॅकिंग (VLT) डिव्हाईस बसवणे अनिवार्य केलं आहे.

जीपीएस ट्रॅकिंग या टँकर्सची योग्य देखरेख आणि सुरक्षितता सुनिश्चित करेल. या व्यतिरिक्त, कोणतेही डायव्हर्जन किंवा उशीर होणार नाही याची काळजी घेता येईल. मंत्रालयाने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, MoRTH ने ऑक्सिजन कंटेनर / टँकर / व्हीकल लोकेशन ट्रॅकिंग (VLT) डिव्हाईस बसवणे अनिवार्य केलं आहे. जीपीएस ट्रॅकिंगमुळे या टँकरची देखरेख आणि सुरक्षा सुनिश्चित होईल, शिवाय वाहतुकीदरम्यान डायव्हर्जन किंवा उशीर होणार नाही, याची काळजी घेता येईल.

संबंधित बातम्या

कोरोनाचं संकट रोखता येत नसेल तर लष्कराकडे आरोग्य सेवा सोपवा; नितीशकुमारांना पाटना हायकोर्टाने फटकारले

Coronavirus News Updates: देशात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, कॅटची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी

तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार, वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू बिनकामाचे; डॉ. गुलेरिया यांचा इशारा

(Tata group to airlift 60 cryogenic tankers from overseas, build 400 oxygen plants)