TCS : टीसीएसमधील एका निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरु, नेमकं काय झालं ते वाचा
कोरोना संकटात वर्क फ्रॉम होमचं कल्चर रुजू झालं. त्यामुळे ऑफिसला जाण्यायेण्याची वेळ आणि घरून कामंही करता आलं. मात्र आता टीसीएसच्या निर्णयाने महिला कर्मचारी वर्ग नाराज झाला आहे.
मुंबई : कोरोना काळात वर्क फ्रॉम होम कल्चरने आयटी आणि इतर कंपन्यांना साथ दिली. ऑफिसात न येता घरूनच कामं होऊ लागली. त्यामुळे कंपन्यांना चांगलाच फायदा झाला आणि कर्मचाऱ्यांचा जाण्यायेण्याचा वेळ वाचला. आता कोरोना स्थिती निवळली असून कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कल्चर मागे घेत ऑफिसला बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची घडी विस्कटली आहे. तसेच जाण्यायेण्याच्या वेळेत संपूर्ण दिवस खर्च होताना दिसत आहे. त्यामुळे कर्मचारी काम सोडण्याच्या तयारीत आहेत. असाच काहीसा निर्णय आयटी कंपनी टीसीएसने घेतला आणि महिला कर्मचाऱ्यांचे धडाधड राजीनामे पडू लागले. टीसीएसचे चीफ एचआर ऑफिसर मिलिंद लक्कड यांनी एका वेबसाईटला सांगितलं की, “वर्क फ्रॉम होम पर्याय संपुष्टात आणल्याने महिला कर्मचारी राजीनामा देत आहेत.”
टीसीएसमध्ये सहा लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. यात 35 टक्के महिलांचा समावेश आहे. टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेसमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं राजीनामा देण्याचं प्रमाण कमी आहे. पण वर्क फ्रॉम होमचा निर्णय मागे घेतल्यामुळे प्रमाण चांगलंच वाढलं आहे. त्यामुळे कंपनीच्या कामावर परिणाम दिसून येईल, असंही काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
“कोरोना संकट आणि त्यानंतर रुजू झालेलं वर्क फ्रॉम होम कल्चर यामुळे महिलांची कामं सोपी झाली होती. घरीच ऑफिसचा सेट बनवून काम केलं जातं. पण आता ऑफिसमध्ये यावं लागतं असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.”, असं टीसीएसच्या चीफ एचआर ऑफिसरने एका वेबसाईटला सांगितलं आहे.
वर्क फ्रॉम होममुळे ऑफिसला जाण्यायेण्याची वेळ वाचत होती. त्याचबरोबर घरातील कामं, मुलांना सांभाळणं आणि कौटुंबिक जबाबदारीही पार पाडता येत होती. मात्र आता कंपनीने वर्क फ्रॉम होम कल्चर बंद करून ऑफिसला येण्यास सांगितल्यानंतर महिला कर्मचारी राजीनामा देत आहेत.
टाटा कन्सलटंसीमध्ये कामात पुरुषांच्या तुलनेत महिलांना प्राथमिकता दिली जाते. त्यामुळे महिलांच्या राजीनामा सत्राचं नेमकं कारण वर्क फ्रॉम होम बंद करणं हेच आहे का? याची चाचपणी केली जातं आहे. टीसीएसने वार्षिक अहवालात नोकरी सोडण्याच्या टक्केवारीबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. पण मागच्या आर्थिक वर्षात काम सोडण्याचं प्रमाण 20 टक्क्यांहून अधिक असल्याचं समोर आलं आहे.