एवढे मोठे केस ? शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या केसांनाच लावली कात्री, पालकांचा गदारोळ
तेलंगणातील एका सरकारी शाळेत मुलांचे लांब केस पाहून शिक्षकाला इतका राग आला की त्यांनी स्वतःच शाळेतील मुलांचे केस कापले. शिक्षकांच्या या वागणुकीमुळे मुलांपासून पालकांपर्यंत सर्वांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मनुष्याच्या सौंदर्यामध्ये त्याच्या केसांचे बरेच महत्व असते. त्यामुळे प्रत्येक जण केसांची विशेष काळजी घेत असतो, तसेच केस कट करताना ( कापतानाही) खास काळजी घेतली जाते. अनेक लोक मोठमोठ्या हेअर पार्लरमध्ये जाऊन मोठी रक्कम भरून केस कापून घेतात आणि चांगला लूक निवडतात. मात्र तेलंगणातील एका शाळेत आगळाच प्रकार घडला. तेथे इंग्रजी विषयाच्या शिक्षकाने स्वत:च विद्यार्थ्यांचे केस कापले. इंग्रजीचे शिक्षक इतके संतापले की त्यांनी वर्गातील एक-दोन नव्हे तर चक्क 15 विद्यार्थ्यांचे केस कापले. या घटनेची माहिती विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी शिक्षकाविरोधात तक्रार केली.
तक्रारीनंतर याप्रकरणी कारवाई करत शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले असून आरोपी शिक्षकाला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे केस का कापले असे शिक्षकांना विचारले असता शिक्षकांनी सांगितले की, त्यांनी अनेकवेळा विद्यार्थ्यांना त्यांचे लांब केस बारीक कापण्यास सांगितले होते, मात्र विद्यार्थी तसेच लांब केस घेऊन शाळेत येत होते.
हेअरकट आवडला नाही
मात्र शिक्षकांनी कापलेले केस काही मुलांना आवडले नाहीत आणि सर्व 15 मुलांनी शाळेसमोर येऊन या घटनेचा निषेध केला. मुलांसह त्यांचे पालकही उपस्थित होते, जे अतिशय संतापले होते. शाळा व्यवस्थापनावर प्रशासनाचाही रोष आहे.
केस कापणे शिक्षकांचे काम नाही
मुलांचे केस कापल्यानंतर या प्रकरणाबाबत शिक्षण विभागाने आरोपी शिक्षकाला निलंबित केले आहे. केस कापणे हे कोणत्याही शिक्षकाचे काम नाही, त्यासाठी वेगळा व्यवसाय ठरवण्यात आला आहे. एखादा विद्यार्थी शिस्तीत शाळेत येत नसेल, तर त्याचे केस स्वत: कापून घेण्याऐवजी त्याच्या पालकांना त्याची माहिती द्यावी, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बजावले आहे.