रेल्वे स्थानकांवर आता सुरक्षित मोबाईल चार्जिंग, पण खिशाला एवढा भार पडणार
आता रेल्वे स्थानकांवर मोबाईल चार्ज करताना तो चोरीला जाण्याची भीती राहणार नाही. परंतू रेल्वे त्यासाठी फि आकारणार आहे.
प्रयागराज | 31 ऑगस्ट 2023 : सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग करताना अनेकदा आपला मोबाईल सुरक्षित नसतो. त्यामुळे आपण निर्धास्तपणे मोबाईल चार्जिंग करु शकत नाही. परंतू आता रेल्वे स्थानकांवर मोबाईल चार्जिंग करताना प्रवाशांना आता चिंता करण्याची काही गरज राहणार आहे. आता रेल्वे स्थानकांवर तुम्हाला चार्जिंग पॉईंट शोधत फिरावे लागणार नाही. आता रेल्वे स्थानकांवर मोबाईल चार्जिंग करताना तो चोरी होण्याची किंवा काही हेराफेरीची काळजी करण्याची गरज नाही. आता रेल्वे फलाटांवर मोबाईल चार्जिंगसाठी कियॉस्क उभारण्यात येणार आहेत. यात मोबाईल सुरक्षित रहाणार असले तरी प्रवाशांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.
उत्तर मध्य रेल्वेच्या ( एनसीआर ) स्थानकांवर सुरक्षितपणे मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या मोबाईलच्या चार्जिंगसाठी सुरक्षितस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे. आता प्रवाशांना आपला मोबाईल चोरी किंवा त्याच्याशी काही छेडछाड होण्याची धोका मिटणार आहे. त्यासाठी प्रवाशांकडून दहा रुपये फि आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत रेल्वे स्थानकांवर मोफत मोबाईल चार्जिंगची सोय उपलब्ध होती. येथे एकाच जागी प्रवाशांना मोबाईल चार्जिंगची सोय होती. परंतू प्रवाशांना मोबाईल चार्जिंग सुरु असताना आपला मोबाईल चोरीला जाऊ नये म्हणून तेथेच उभे रहावे लागत असायचे. आता रेल्वे स्थानकांवर कियॉस्क उभारण्यात येत आहेत, यातून प्रति मोबाईल दहा रुपये चार्ज आकारण्यात येणार आहे. यातून रेल्वेला उत्पन्न मिळणार आहे. उत्तर मध्य रेल्वे पहिल्या टप्प्यात असे 22 कियॉस्क मिशन लावणार आहेत.
मोबाईल चार्जिंगला लावून कुठेही फिरा
प्रयागराज जंक्शनसह कानपूर, झांशी, आग्रा, ग्वाल्हेर यासारख्या स्थानकात पहिल्या टप्प्यात ही मोबाईल चार्जिंग कियॉस्कची सुविधा उपलब्ध होणार आहे. या मशिनवर मोबाईल चार्जिंगला लावून प्रवासी कुठेही आपले काम करायला जाऊ शकतात. त्यांचा मोबाईल सुरक्षित राहील. या मशिनला एनसीआरच्या अनेक स्थानकांवर बसविण्यास यावर्षी सुरुवात झाली आहे. या सुविधेने मोबाईल चार्जिंगची पद्धत बदलली जाणार आहे.
एकाचवेळी 24 मोबाईल चार्ज होणार
एटीएम मशिन सारख्या दिसणाऱ्या या कियॉस्क मशिनमध्ये 24 लॉकर असणार आहेत. या मशिनमध्ये मोबाईल ठेवण्यासाठी पासवर्ड टाकून लॉकर खोलावे लागणार आहे. मोबाईल चार्जिंगसाठी दहा रुपयांची नोट आत टाकावी लागेल.यातून बारकोडची स्लीप निघेल. स्लीप स्कॅन केल्यावरच लॉकर उघडले जाईल. स्क्रीनवर मोबाईल किती टक्के चार्ज झाला आहे ते कळेल. एक तासापेक्षा जास्त वेळ झाल्यास पुन्हा पैसे भरावे लागतील. एकाच वेळी 24 मोबाईल चार्ज होतील.