जम्मू-काश्मीर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर; 48 तासांत 3 हल्ले, कठुआमध्ये एक दहशतवादी ठार
Terrorist Attack : गेल्या 48 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. या दोन दिवसांत दहशतवाद्यांनी तीन हल्ले केले आहेत. सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला टिपले. काही भागात चकमक सुरु आहे. काय आहे अपडेट
जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सुरक्षा दलांच्या मजबूत इराद्यापुढे त्यांना नांग्या टाकाव्या लागल्या आहेत. कठुआती हिरानगर सेक्टरमध्ये लष्काराने नाकाबंदी केली आहे. एका गावात दहशतवादी शिरल्याची माहिती मिळताच लष्कराने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूने गोळीबार झाला. त्यात एक दहशतवादी ठार झाला. एका नागरिकाला पण गोळी लागली. डोडा जिल्ह्यातील काही भागात दहशतवादी सक्रिय असल्याचे दिसून आले. त्याठिकाणी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांवर ताबडतोब हल्ले सुरु केले आहेत.
गेल्या 48 तासांत 3 हल्ले
डोडा जिल्ह्यात दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या 48 तासांत 3 हल्ले करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी पोलीस चौक्या, ग्रामीण भागातील नागरीक आणि पर्यटकांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. डोडा जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्यावेळी सुरक्षा दलासोबत दहशतवाद्यांची चकमक झाली. त्यात 6 जवान जखमी झाले. राष्ट्रीय रायफल युनिटचे 5 तर एसपीओचा एक जवान जखमी झाला आहे. पण सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पळता भूई थोडी केली आहे.
अफवांना नाही थारा, पोलीस, लष्कराची करडी नजर
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे एडीजी आनंद जैन यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात एक नागरीक जखमी झाला. त्याला लागलीच सुरक्षा दलांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दहशतवाद्यांनी एका गावात पाणी मागितले. ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्यावर संशय आला. त्यांनी लागलीच त्यांची माहिती सुरक्षा यंत्रणेला दिली. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन जैन यांनी केले आहे.
दहशतवाद्याचे रेखाचित्र प्रसिद्ध
जम्मू-काश्मीरमधील रियासी येथील भाविकांच्या, यात्रा बसवर नुकताच हल्ला करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचे रेखाचित्र, स्केच तयार करण्यात आले आहे. हे रेखाचित्र प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानंतर तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी या दहशतवाद्याची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना टिपण्यासाठी सुरक्षा दलाची 11 पथके तयार करण्यात आली आहे. 9 जून रोजी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. त्यात 9 भाविकांचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक जण जखमी झाले. या सर्व प्रकरणानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने संताप व्यक्त केला आहे. त्यांनी दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.