आता धूम्रपानासाठीचे वय 18 वरुन 21 वर्षे?; सरकारच्या नव्या कायद्यानुसार ‘हे’ मोठे बदल होणार
देशात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत केंद्र सरकार मोठा कायदा करण्याच्या तयारीत आहे. (smoking and tobacco products)
नवी दिल्ली : देशात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत केंद्र सरकार मोठा कायदा करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने या नव्या कायद्याचा मसुदासुद्धा तयार केला आहे. हा कायदा अमालात आल्यानंतर आता तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठीचे वय 18 वरुन 21 वर्षे होणार आहे. तसेच नव्या कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थांची विक्री किंवा पुरवठा करताना आढळल्यास त्याला दंडात्मक कारवाईलादेखील सामोरे जावे लागू शकते. तरुणांमध्ये धूम्रपानाचे वाढत असेलेले प्रमाणही या नव्या कायद्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. यानंतर 18 वर्षांखालील युवकांनी जर धूम्रुपान केले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
केंद्र सरकारने सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन (व्यापार, उत्पादन, पुरवठा, वितरण, जाहिरात आणि नियमन) संशोधन कायदा 2020 या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या नव्या कायद्यात सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांचा व्यापार करण्यासाठीचे वय 18 वरुन 21 वर्षे करण्यात येणार आहे. ही तरतूद केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विधेयकाचा एक भाग आहे. मूळात या नव्या विधेयकाच्या माध्यमातून केंद्र सरकार सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन (व्यापार आणि उत्पादन तसेच पुरवठा आणि वितरणास बंदी) बंदी कायदा 2003 या जुन्या कायद्यात नवे बदल करु पाहत आहे.
शाळेपासून 100 मीटरच्या परिसरात विक्रीस बंदी
तसेच या नव्या विधेयकामध्ये कोणत्याही शैक्षणिक संस्थानाच्या 100 मीटरच्या परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घालण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. तसेच या नव्या विधेयकाच्या माध्यमातून सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांना विकण्यासाठी निश्चित मात्रा ठरवण्यात येणार आहे. सिगारेट तसेच तंबाखूजन्य उत्पादनाचे उत्पादन, पुरवठा, वितरणावर सरकारचे नियंत्रण असणार आहे. उत्पादन, पुरवठा, वितरणाचे प्रमाण ठरवून दिल्यानंतरच सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यापार करता येणार आहे.
5 वर्षांचा तुरुंगवास
सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ उत्पान कायद्यातील कलम 7 चे उल्लंघन केल्यानंतर शिक्षा म्हणून दंडात्मक कारवाईचीही तरतूद या नव्या कायद्यात करण्यात येणार आहे. नव्या विधेयकानुसार नव्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
दरम्यान, या नव्या प्रस्तावित कायद्याचा सध्या मसुदा तयार होत आहे. हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर धुम्रपान करणाऱ्यांवरही काही प्रमाणात लगाम लागू शकतो असे सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा सौरव गांगुलीच्या पत्नीला फोन, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन
कोरोनाची लस कुण्या पक्षाची नाही, मी आनंदाने घेईन – ओमर अब्दुल्ला
कायमचं ‘वर्क फ्रॉम होम’ करायचंय की ऑफिसला जायचंय?, निर्णय तुमचाच; सरकारनं मागविल्या सूचना