सर्वाधिक निर्बंध असलेला देश, अनेक देश विरोधात, तरीही ताठ मानेने उभा
युक्रेन युद्धापूर्वी इराण देशावर तर युक्रेन युद्धानंतर अनेक देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले होते. आता इस्रायलला आणि हमास यांच्या युद्धादरम्यान सर्वच मुस्लिम देशांनी इस्रायलवर निर्बंध लादले आहेत.
नवी दिल्ली | 16 जानेवारी 2024 : युक्रेन युद्धापूर्वी इराण देशावर जास्तीत जास्त निर्बंध लादण्यात आले होते. संयुक्त राष्ट्र, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, युरोपियन युनियनसह अनेक देशांनी इराण देशावर 3116 निर्बंध लादले होते. हेच निर्बध आता 4953 पर्यंत वाढले आहेत. मात्र, इतके निर्बंध लादले गेलेला इराण हा एकमेव देश नाही. या यादीत एकही अन्य देशांचाही समावेश आहे. परंतु, यातील विशेष बाब म्हणजे या देशांवर अनेक निर्बंध असूनही हे देश जगभरात ताठ मानेने जगत आहेत. त्यांची आर्थिक प्रगती होत आहे.
युक्रेन युद्धानंतर अनेक देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले होते. रशियावर सध्या 18,772 निर्बंध आहेत. तर, युक्रेन युद्धानंतर आणखी 1,600 हून अधिक निर्बंध लादले गेले होते. यातील 11462 निर्बंध हे फक्त रशियन नागरिकांवर लादण्यात आले आहेत. रशियन नागरिकांच्या व्यवसायावर बंदी घालण्यात आली. त्यांच्या कंपन्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या हालचालींवर निर्बंध आहेत. अमेरिका आणि ब्रिटनसह अन्य पाश्चिमात्य देशांनी हे बहुतांश निर्बंध लादले आहेत.
तिसर्या क्रमांकावर सीरिया देश आहे. सिरीयावर 2811 निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याची सुरुवात या देशातील गृहयुद्धानंतर झाली. अमेरिकेसह अनेक देशांनी येथील वस्तू, सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्या निर्यात, विक्री किंवा पुरवठ्यावर निर्बंध लादले आहेत. यामुळे येथील लोक गुगल, नेटफ्लिक्स किंवा अॅमेझॉन वापरू शकत नाहीत.
उत्तर कोरियावर एकूण 2171 निर्बंध लादण्यात आले आहेत. यूएनच्या निर्देशांनुसार येथील लोक आंतरराष्ट्रीय व्यवसाय करू शकत नाहीत. कपडे निर्यात करू शकत नाही. कच्च्या तेलाच्या आयातीवर त्यांना बंदी घालण्यात अली आहे. एवढे निर्बंध घालूनही उत्तर कोरियावर त्याचा कोणताही प्रभाव दिसत नाही. उलट तो ताठ मानेने उभा आहे.
रशियासोबत असलेल्या मैत्रीचे परिणाम बेलारूस देशाला भोगावे लागत आहेत. बेलारुसवर 1454 निर्बंध लादण्यात आले आहेत. येथील लोक पाश्चात्य जगात कुठेही व्यवसाय करू शकत नाहीत. तिथून कोणताही माल आयात करू शकत नाही. त्यांचे व्यासपीठ वापरू शकत नाहीत.
भारताच्या जवळ असलेला म्यानमार देशही निर्बंधांच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये लष्करी सत्ताबदलानंतर संयुक्त राष्ट्र, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा यासह अनेक देशांनी त्यावर निर्बंध लादले. सध्या म्यानमार देशावर असलेल्या निर्बंधांची संख्या 988 वर पोहोचली आहे.